मोदींच्या माफीसाठी काँग्रेसचा संसदेत गोंधळ

गुजरातचा निकाल लागला असला तरी भाजपा आणि काँग्रेसमध्ये प्रचारादरम्यान आलेली कटुता कायम आहे.

Updated: Dec 19, 2017, 11:12 PM IST
मोदींच्या माफीसाठी काँग्रेसचा संसदेत गोंधळ  title=

नवी दिल्ली : गुजरातचा निकाल लागला असला तरी भाजपा आणि काँग्रेसमध्ये प्रचारादरम्यान आलेली कटुता कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये याचे पडसाद उमटले.

एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याबाबत पंतप्रधानांनी मनमोहन सिंगांची माफी मागवी, अशी मागणी करत लोकसभेमध्ये काँग्रेसचा गोंधळ सुरूच राहिला. यामुळे वारंवार कामकाजात व्यत्यय आला.

प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्याची मागणी करत काँग्रेस खासदार मधल्या मोकळ्या जागेत आले. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही मागणी फेटाळून लावली. प्रचारात जे झालं, त्याचा वापर करून कामकाजात विघ्न आणू नये, असं आवाहन त्यांनी केलं. यावर काँग्रेसचं समाधान झालं नाही.

मल्लिकार्जून खरगे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता महाजन यांनी त्यांना अडवलं. त्यानंतर काँग्रेसनं कामकाजावर बहिष्कार टाकला. राज्यसभेत मात्र या वादावर पडदा पडल्याचं चित्र बघायला मिळालं.