सत्ता सोडाच पण काँग्रेसला धड 'ही' गोष्टही जमली नाही- मोदी

काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा नीट अभ्यास करत नाहीत.

Updated: Oct 6, 2018, 05:13 PM IST
सत्ता सोडाच पण काँग्रेसला धड 'ही' गोष्टही जमली नाही- मोदी title=

अजमेर: सशक्त लोकशाहीसाठी सक्षम अशा विरोधी पक्षाची गरज असते. मात्र, काँग्रेसला साधी ही गोष्टदेखील जमलेली नाही, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते शुक्रवारी अजमेर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. या काळात सत्ताधारी म्हणून ते अपयशी ठरलेच. मात्र, आता विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडण्यातही त्यांना सपशेल अपयश असल्याचे मोदींनी म्हटले. 
 
 काँग्रेसचे नेते कुठल्याही विषयाचा नीट अभ्यास करत नाहीत. मेहनत घेत नाहीत. म्हणून त्यांना खोटयाचा आधार घ्यावा लागतो. कशाचा विरोध करावा आणि कशाचा विरोध करू नये हेही काँग्रेसला कळेनासे झाल्याची टीका मोदींनी केली. 
 
 तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपच पुन्हा सत्तेत येईल, असा दावा मोदींनी केला. भाजपच्या स्थापनेनंतर कोणताही पक्ष राजस्थानमध्ये लागोपाठ सत्तेवर आलेला नाही. यावर्षी या परंपरेत खंड पडणार असून भाजप दुसऱ्यांदा सत्तेत येईल, असे मोदींनी सांगितले.