राहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार... सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.

राजीव कासले | Updated: Aug 4, 2023, 02:35 PM IST
राहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार... सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? title=

Rahul Gandhi : काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस चांगली बातमी घेऊन येणारा ठरला. मोदी आडनाव प्रकरणात सुरत कोर्टाने (Surat Court) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनवाली. सूरत कोर्टाच्या या निकालानंतर राहुल गांधी यांचं संसद सदस्यपदही गेलं. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे त्यांना पुढची किमान सहा वर्ष निवडणुक लढवता येणार नव्हती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केली. मात्र ती फेटाळून लावण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधींनी आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान दिलं.

सुप्रीम कोर्टाकडून दिलासा
याप्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रिम कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर प्रश्न उपस्थित केला तसंच सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर ताशेरे ओढले आहेत. 

संसदेचे दरवाजे उघडणार
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राहुल गांधी यांच्यासाठी संसदेचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकतात. तसंच त्यांचं खासदारपदही कायम राहणार आहे. राहुल यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर वायनाड जागेसाठी पोटनिवडणूक झाली असती तर राहुल गांधी यांचं खासदारपद गेलं असंत. पण वायनाडमध्ये अद्याप पोटनिवडणूक झालेली नाही. शिवाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूकही लढवू शकणार आहेत. 

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
2019 च्या निवडणुकीदरम्यान राहुल गांधीं यांनी कर्नाटकमधील कोलारमधल्या प्रचारसभेत सगळ्या चोरांचं आडनाव हे मोदी का असतं? असं वक्तव्य केलं होतं. नीरव मोदी, ललित मोदी यांच्या आडनावावरुन त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला होता. मोदी समाजाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला तसंच गुजरातचे भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला. राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी चोर म्हणत संपूर्ण समाजाचा अपमान केला असल्याचं त्यांना तक्रारीत म्हटलं होतं.