अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव

चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत.  अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 26, 2023, 09:49 PM IST
अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव title=

India-China News: चीनची सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. अरूणाचल प्रदेशनंतर  उत्तराखंडवर देखील चीनचा डोळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने 2020 मध्ये तिबेट आणि अरूणाचल सीमेवर एक 100 घरांचं खेडं अचानक उभारल्याचं उघड झाले होतो. अमेरिकेचं लष्करी मुख्यालय पेंटागॉनच्या अहवालात ही बाब उघड झाली होती. त्यानंतर आता  उत्तराखंड येथे LAC पासून 11 किमी अंतरावर चीनने तब्बल 400 गावं वसवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

काय आहे चीनचा डाव?

चीन उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या भागात चीन नविन गावांची निर्मीती करत आहे. ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील.  चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी या गावांवर लक्ष ठेवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक गावात 250 घर असणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही सीमावर्ती गावे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) केवळ 11 किलोमीटर अंतरावर बांधली जात आहेत. चीन LAC पासून 35 किमी अंतरावर 55-56 घरे असलेली गावेही बांधण्याचा प्रयत्न आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील सेक्टरमधील 400 गावे वसवण्याच्या चीनचा डाव आहे.  

अरूणाचलवर चीनची पुन्हा वक्रदृष्टी

लडाखपासून अरूणाचलपर्यंत सीमेवर चीनची युद्धखोरी सुरूच आहे. पुन्हा एकदा चिनचे मनसुबे उघड झालेत. तिबेट आणि अरुणाचल प्रदेशमधील वादग्रस्त भागात चिननं १०० घरांचं एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. 
लडाखमधील संघर्षाबाबत चिन कांगावा करत असल्याचं अमेरिकेचं लष्करी मुख्यालय पेंटागॉननं आपल्या वार्षिक अहवालात हे म्हटलं होते.  2020मध्ये अरूणाचल सीमेवर चीननं हे गाव वसवलंय. 100 घरांचं हे गाव आहे. 

चीनने बुलेट ट्रेनमधून अरूणाचल प्रदेशाच्या सीमेपर्यंत सैन्य आणलं

चीनने बुलेट ट्रेनमधून अरूणाचल प्रदेशाच्या सीमेपर्यंत सैन्य आणले होते.  तिबेटची राजधानी ल्हासापासून 160 किमी वेगाने निघालेली बुलेट ट्रेन अरूणाचल प्रदेश सीमेलगच्या निंगची शहरात पोहोचली आहे. भारताविरोधी सैन्य कारवायांना गती देत चीनने हे शक्तीप्रदर्शन केलं आहे. याआधी या भागात अनेक हवाई तळही चीनने उभारले आहेत. तिथे क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत. अलीकडेच ल्हासा- निंगची रेल्वेमार्गाचं बांधकाम पूर्ण झालं. या भागात चीनच्या आर्मीने सैन्यात नव्याने दाखल झालेल्या सैनिकांना निंगचीमध्ये बुलेट ट्रेनने पाठवले होते. निंगची शहर भारत चीन सीमेपासून अगदी जवळ आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा हिस्सा मानतो. याच ईर्षेतून चीनने या परिसरात सैन्य कारवाया वाढवल्या आहेत. चीनने अलीकडेच तिबेटच्या हिमालयीन भागात विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली आहे. जवळपास 435.5 किलोमीटर लांबीच्या सिचुआन-तिबेट बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले होते.