Chhattisgarh News : सरकारी अधिकारी काही वेळा आपल्या अधिकारांचा स्वतःच्या फायद्यासाठी असा काही वापर करतात त्यांचा त्रास सामान्यांना सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) घडलाय. एका सरकारी अधिकाऱ्याने त्याचा हरवलेला फोन शोधण्यासाठी आख्खा तलाव रिकामा करण्याचा प्रताप केला आहे. या प्रकाराची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून त्या अधिकाऱ्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. मात्र या बहाद्दर अधिकाऱ्याने फोन शोधण्यासाठी तब्बल 21 लाख लीटर पाणी उपसल्याचं समोर आले आहे. अधिकाऱ्याने मनमानी कारभार करत तळ्यामध्ये साठवलेले लाखो लीटर पाणी वाया घालवले.
कडाक्याच्या उन्हात लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळत असताना एका अधिकाऱ्याने तब्बल 21 लाख लीटर पाणी वाया घालवलं आहे. एवढ्या पाण्यात 1500 एकरातील शेताला सिंचनाने पाणी देता आले असते. मात्र अधिकाऱ्याने पाणी वाया घालवलं. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडला आहे. अंतागड विधानसभा मतदारसंघातील पखंजूर भागात अन्न निरीक्षकाने पाण्यात पडलेला दीड लाख किमतीचा मोबाईल शोधण्यासाठी जलाशयातून 21 लाख लीटर पाणी रिकामे केले. कोणतीही परवानगी न घेता चार दिवस मनमानी पद्धतीने अधिकाऱ्याने तलावामध्ये साठवलेले लाखो लीटर पाणी वाया घालवले.
अधिकाऱ्याने गावातल्या लोकांना गोळा करत मोबाईल शोधण्याच्या कामाला लावले होते. धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्याने त्याच्या अधिकारक्षेत्राखाली असलेल्या रेशन दुकानांच्या कर्मचाऱ्यांनाही या कामासाठी कामाला लावले होते. तरीही मोबाईल सापडला नाही. शेवटी अधिकाऱ्याने तलावातून पाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केल्यानंतर पाण्याचा उपसा सुरू झाला. त्यासाठी दोन मोठे डिझेल पंप बसविण्यात आले होते.
नेमकं काय झालं?
अन्न निरीक्षक राजेश बिस्वास रविवारी त्यांच्या मित्रांसोबत जलाशयाच्या भागात पार्टीसाठी गेले होते. पार्टीदरम्यान त्यांचा मोबाईल जलाशयाच्या पाण्यात पडला. पाण्यात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी राजेश बिस्वास यांनी सोमवारी सकाळपासून मोबाईल शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर चार दिवसांनी मोबाईल सापडला. मात्र लाखो लिटर पाणी वाया घालवणाऱ्या अन्न निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्याने केली फसवणूक
जलसंपदा विभागाचे अधिकारी आर.सी. धिवार यांनी सांगितले की, "अन्न निरीक्षकांकडून काही पाणी काढण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला दिली होती. मात्र सांगितले त्यापेक्षा जास्त पाणी बाहेर काढले. आम्हाला याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन हा सर्व प्रकार थांबवला. मात्र गाठून बाहेर येणारे पाणी थांबवले. जलाशय जवळपास रिकामा झाला होता. त्यानंतर अन्न निरीक्षकाचा फोन सापडला."