रायपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावं हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वच ठिकाणी शौचालयांची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, शौचालय बांधण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी एका अभियंत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यात शौचालय बांधण्यासाठी एक अभियंता तरुणीसोबत मोबाईलवर अश्लिल संभाषण करत होता. इतकेच नाही तर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणीही करत होता.
रायगढ नगरपालिकेतील अभियंता आय. पी. सारथी याच्यावर आरोप करण्यात आला आहे की, शौचालय बांधण्यासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची अट ठेवली होती. या प्रकरणी सारथी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेंदूडीपा जूटमिल येथे राहणारी एका ३२ वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मी शौचालय बांधण्यास सुरुवात केली. मात्र, २१ नोव्हेंबर रोजी नगरपालिकेकडून अचानक नोटीस देत बांधकाम अनधिकृत असल्याचं म्हणत काम थांबवण्यास सांगितलं.
त्यानंतर पीडित महिलेने नगरपालिकेतील अभियंता यांच्यासोबत संपर्क केला. मात्र, त्या अभियंत्याने मला कॉल करुन अश्लिल संभाषण सुरु केलं आणि शारीरिक संबंध ठेवण्याची अट ठेवली असंही पीडित महिलेने म्हटलं आहे.
"माझं बोलणं ऐकलं नाहीस तर तु बांधलेलं शौचालय तोडून टाकू, मी नगरपालिकेतील मोठा अधिकारी आहे" अशी धमकी या अभियंत्याने पीडित महिलेला दिली होती.