VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

Viral Video : नोएडातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिवाळीच्या रात्री एका कार चालकाने रस्त्यावर फटाके फोडणाऱ्यांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 13, 2023, 05:53 PM IST
VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर title=

Crime News : देशभरात एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी होत असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अ‍ॅण्ड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत एक पाच वर्षाच्या मुलीसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील कार चालकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुर केला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पहिल्या प्रकरणात नोएडाच्या सेक्टर-119 मध्ये दिवाळीच्या रात्री एका कारने तिघांना धडक दिली. धडकेनंतर कार चालक कारसह पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-119 मध्ये असलेल्या अल्डिको इन्व्हिटेशन सोसायटीच्या बाहेर फटाके फोडत होते. त्याचवेळी ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती देताना मुलीच्या वडिलांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 'दिवाळीच्या रात्री 10.45 च्या सुमारास एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारने मुलगी, तिची एक मैत्रिण आणि मित्राच्या सासऱ्याला सेक्टर 119 मधील सोसायटीबाहेर धडक दिली. तिघेही सध्या आयसीयूमध्ये आहेत,' असे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की कारचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता. त्यामुळे तिचा नंबरही कोणाला दिसत नव्हता. अतिरिक्त पोलीस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, हिट अँड रनच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तीन जखमींना उपचारासाठी कैलास रुग्णालयात नेले. तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकेही तयार करण्यात आली होती.

दरम्यान, हिट अँड रनच्या दुसर्‍या घटनेत सोसायटीचा एक गार्ड जखमी झाला आहे. गौर सिटी 2, ग्रेटर नोएडामध्ये हा प्रकार घडला आहे. एका एसयूव्ही कारने गार्डला धडक दिली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एसयूव्हीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एसयूव्ही झिगझॅग पद्धतीने रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. त्यानंतर गाडी चालकाने अचानक सुरक्षा रक्षकाला धकड दिली आणि त्यानंतर तो तिथून गेला.