जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांकडून भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरमधील  कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. 

Updated: Aug 7, 2020, 11:01 AM IST
जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांकडून भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या  title=
संग्रहित छाया

श्रीनगर  : जम्मू काश्मीरमधील  कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. काझीगुंड येथील राहत्या घरी सजाद अहमद खांडे यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सजाद आपल्या घराबाहेर पडले असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

सजाद यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.  सरपंच सजाद  यांच्यासोबत अन्य सुरक्षित असलेल्या निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते. ते काल सकाळी कॅम्प सोडून  आपल्या घरी गेले होते. यावेळी ते घराबाहेर होते. २० मीटर अंतरावरुन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, याआधी जून महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित सरपंच अजित पंडित यांचीही हत्या केली होती. तर मागील ४८ तासातील ही दुसरी घटना आहे. बुधवारी ४ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजारच्या अखरण भागात सरपंच पीर अरिफ अहमद शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.