भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...  

Updated: May 29, 2024, 11:47 AM IST
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू  title=
bjp mp Brij Bhushan Sharan Singh son karan bhushan vehicles convoy accident 2 casualties reported

Accident News : (Uttar Pradesh) उत्तर प्रदेशच्या गोंडा कर्नलगंज भागातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. करण भूषण यांच्या ताफ्यातील वाहनानं 4 जणांना चिरडलं असून, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर,  2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

करण भूषण हे कैसरगंज येथील भाजप उमेदवार आहेत. त्यांच्या ताफ्यातील गाडीने 4 जणांना चिरडल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. तिथं काहींनी जखमींना तातडीनं रुग्णालयात नेलं तर, काहींनी पोलिसांना माहिती दिली. अद्यापही या अपघातातील मृतांची ओळख पटू शकलेली नाही. 

 

हेसुद्धा वाचा : Pune Porsche Accident : एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर

कोण आहेत करण भूषण सिंह? 

करण भूषण सिंह (Karan Bhushan Singh) हे भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांचे धाकटे चिरंजीव आहेत. डबल ट्रॅप शूटींगमध्ये ते राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून त्यांनी कुस्ती संघाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीनंतर लोकसभेचीही निवडणूक लढवली. सध्या मात्र त्यांच्याभोवती असणारा अडचणींचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. 

दरम्यान, करण भूषण यांच्या ताफ्यातील वाहनामुळं झालेल्या या अपघातानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथं झालेल्या एका अशाच अपघाताच्या आठवणींनी डोकं वर  काढलं. जिथं भाजप नेते अजय मिश्रा टेनी यांचे चिरंजीव आशिष मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. या अपघातामध्ये आठ जणांचा बळी गेला होता. कथित स्वरुपात आणि एफआयआरमधील माहितीनुसार आशिष मिश्राच अपघातावेळी ते वाहन चालवत होते.