'अनुच्छेद ३७१ ला छेडणार नाही'; अमित शाह यांचं आश्वासन

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला.

Updated: Sep 8, 2019, 05:52 PM IST
'अनुच्छेद ३७१ ला छेडणार नाही'; अमित शाह यांचं आश्वासन title=

गुवाहाटी : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. यानंतर ईशान्य भारताला विशेष दर्जा देणाऱ्या अनुच्छेद ३७१ बद्दलही काहींनी भीती व्यक्त केली होती. पण अनुच्छेद ३७१ ला अजिबात छेडणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. अमित शाह हे गुवाहाटीमध्ये नॉर्थ इस्टर्न काऊन्सिलच्या ६८व्या अधिवेशनाला आले होते, तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिलं.

'भाजप सरकार अनुच्छेद ३७१चा सन्मान करतं. हा अनुच्छेद भारतीय संविधानाचं विशेष प्रावधान आहे. या अनुच्छेदामध्ये बदल करण्यात येणार नाहीत. अनुच्छेद ३७० रद्द करण्याचं विधेयक जेव्हा संसदेत आलं, तेव्हा विरोधकांनी अनुच्छेद ३७१ देखील हटवला जाईल, असं सांगितलं. पण भाजप असं काहीही करणार नाही,' असं अमित शाह म्हणाले.

'ईशान्य भारत आणि भारताचा संबंध महाभारताच्या काळापासून आहे. अर्जुन आणि भीमाची मुलं ईशान्येतलीच होती. अर्जुनाचं लग्न मणीपूरमध्ये झालं होतं. तर श्रीकृष्णाच्या नातवाचं लग्नही ईशान्येतच झालं होतं. आम्ही ईशान्य भारताच्या संस्कृतीला पुढे घेऊन जाऊ,' असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं.

'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात होणारा विकास तुम्हाला वेगळ्या स्थानावर घेऊन जाईल. आज इकडे ८ मुख्यमंत्री आहेत, यातला एकही काँग्रेसचा नाही. ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया कमी झाव्या आहेत. जे हत्यारं टाकतील ते सोबत येऊ शकतात. ज्यांच्या हातात हत्यार आहे त्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. २०२२ पर्यंत ईशान्य भारतातल्या सगळ्या ८ राज्यांना रेल्वे सेवा पुरवली जाईल,' असं अमित शाह यांनी सांगितलं.