काश्मीरमधील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 29, 2019, 09:16 AM IST
काश्मीरमधील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक title=

नवी दिल्ली: काश्मीरसंदर्भात रविवारी सुरक्षादलांची एक महत्त्वाची बैठक झाली. गुप्तहेरांच्या काही अहवालांनंतर सुरक्षादलांना काश्मीरबाबत काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेत. केंद्र सरकारने अतिरिक्त १० हजार सैनिकांना काश्मीर खोऱ्यात तैनात केले आहे.

सुरक्षादलांच्या बैठकीत चार महिन्यांचे दाणापाणीही जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी खोऱ्याचा दौरा केल्यावर केंद्र सरकारने तातडीने १० हजार सैनिक खोऱ्यात तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलम ३५ ए रद्द करण्याबाबत काही निर्णय झाल्यास प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यासाठी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. 

याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील राजकीय परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी भाजपाच्या जम्मू-काश्मीर कोअर गटाची मंगळवारी बैठक होणार आहे. 

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह काही ज्येष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित असतील. मोदी आणि शाह यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील वेगवेगळ्या भागांतून जवानांना एअरलिफ्ट करून काश्मीरमध्ये आणण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच खोऱ्यात ४० हजार अतिरिक्त सुरक्षादलांना तैनात करण्यात आले होते. त्यामुळे, आणखीन १० हजार जवानांना तैनात करण्याच्या भाजपा सरकारच्या या निर्णयाने अनेकजण बुचकाळ्यात पडले आहेत.