Punjab CM on VIP Culture : मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून पंजाबमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. बुधवारी पुन्हा भगवंत मान सरकारने राज्यातून व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले. बुधवारी भगवंत मान सरकारने अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.
माजी मुख्यमंत्री राजेंद्र कौर भट्टल यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. यासोबतच माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी (ओम प्रकाश सोनी) यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. याशिवाय अनेक माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
भगवंत मान यांच्या या निर्णयानंतर पंजाब पोलिसांनी १२७ पोलीस कर्मचारी आणि ९ सरकारी वाहने परत आणली आहेत. आता हे पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
याआधीही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापन होताच माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याची घोषणा केली होती. मार्चमध्ये काँग्रेसचे मनप्रीत सिंग बादल आणि परगट सिंग यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती.