उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय.  उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत.

Updated: Nov 22, 2018, 10:57 PM IST
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल title=

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत जाहीर सभा घेण्यावर बंदी आहे. त्यामुळे आता जनसंवादाचा कार्यक्रम ठरवण्यात आला. उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत. प्रथम संत महंतांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामललाच्या दर्शनला जातील. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. 

दरम्यान, अयोध्येत शिवसेना पक्ष प्रमुखांच्या दौऱ्याच्या दिवशीच कार्यक्रमाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरुन आता उत्तर प्रदेश सरकारने टोलवाटोलवी सुरू केलीय.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम आहे, त्यांनी परवानगी मागितली आहे. तिथलं स्थानिक प्रशासन परिस्थिती पाहून निर्णय घेईल. शिवसेना नेत्यांनी प्रतीक्षा करावी. त्यांनी सभेच्या परवानगीसाठी अर्ज केला असेल तर अर्जाच्या क्रमानुसार जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्देश मिळतील, असं मौर्य यांनी म्हटलंय. 

मंदिर वही बनाएंगे म्हणत लोकांना आणखी किती काळ मूर्ख बनवाल, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारलाय. उद्धव यांनी शिवनेरीवरील शिव जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. इथल्या मातीचा मंगलकलश घेऊन ते अयोध्येला रवाना होणार आहेत. अयोध्येला जाण्यापूर्वी त्यांनी शिवनेरी गडावरच्या शिवजन्म स्थळाचं दर्शन घेतलं आणि उपस्थित शिवभक्त - रामभक्तांशी संवाद साधला. आजवर  राममंदिर उभारणीच्या केवळ घोषणा झाल्या, आश्वासनं दिली गेली, पण राममंदिर उभं राहिलं नाही. त्यामुळे आता आपण ताकाला जाऊन भांडं  लपवणार नाही तर आश्वासन न पाळणाऱ्यांचा भंडाफोड करणार असल्याचा टोला उद्धव यांनी भाजपचं  नाव न घेता लगावला.