त्रिपुरा : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा पूर्वोत्तर राज्यांमध्येही आढळते. यानिमित्ताने 9 आणि 10 डिसेंबर रोजी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे संत संस्कृतीचा जागर अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाचे आयोजन (Ashtalakshmi Sant Vichar Sammelan) करण्यात आले आहे. पर्यटन विभाग, त्रिपुरा सरकार, अमरवाणी इव्हेंट्स फाऊंडेशन आणि इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड यांनी आयोजित केलेल्या परिषदेत ईशान्येकडील राज्यांतील संत साहित्याचे विद्वान सहभागी घेणार आहेत. या परिषदेला काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विचारांची देवाण घेवाण करण्यात येईल.
त्रिपुराचे चित्त महाराज हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. त्रिपुरातील संत विचार संमेलन हे 'वसुधैव कुटुंबकम'चं प्रतीक असणार आहे. अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन हे महाराष्ट्रातील कोल्हापुरात आयोजित पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्या धरतीवर आधारित भव्य असं प्रतिस्वरूप असेल असं आयोजकांनी सांगितलं. "सर्वे भवन्तु सुखिना सुर्वे संतु निरामय" हा संदेश यामाध्यमातून दिला जाणार आहे.
ईशान्येतील 'सेव्हन सिस्टर्स' म्हणजे सिक्कीमसह सात राज्ये आणि आठ राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अष्टलक्ष्मी' म्हणून संबोधले. अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाची संकल्पना यावर आधारित आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, रामदास स्वामी, संत नामदेव, संत चोखामेळा असे संत लाभले. तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये धनी शंकरदेवाचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांनी साहित्य, मौखिक परंपरा, संगीत, नृत्य, लोककला, नाटक यातून व्यक्त होणारी संत संस्कृती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाचे आयोजन केले आहे.
कोरोनाच्या भीषण संकटानंतर अशा प्रकारच्या विचारांची देवाण घेवाण आवश्यक असल्याचं मदन महाराज गोसावी (सदस्य, एनसीएलटी-जे) म्हणाले. संत परंपरेचे विचार भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बैठक आवश्यक असल्याचेही ते सांगतात.
त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा म्हणाले की, "देशातील इतर भागांनाही या संताच्या साहित्याची माहिती व्हावी, यासाठी आम्ही त्रिपुरामध्ये अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाचे आयोजन करत आहोत."