मोदी-पवार भेटीमध्ये शाहंची एन्ट्री, नेमकी कशाची चर्चा?

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

Updated: Nov 20, 2019, 03:47 PM IST
मोदी-पवार भेटीमध्ये शाहंची एन्ट्री, नेमकी कशाची चर्चा? title=

नवी दिल्ली : राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास ४५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा न झाल्याची माहिती पवारांनी दिलीय. मात्र पवार मोदी भेट सुरू असताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही या बैठकीला आल्याचं समजतंय. त्यामुळे तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता लागलीय.

पवारांच्या भेटीनंतर मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पवारांच्या भेटीत दुष्काळाशिवाय आणखी काय चर्चा झाली? याबाबत तर्क वितर्कांना उधाण आलंय.

शरद पवार यांनी मोदींना राज्यातल्या ओल्या दुष्काळाची माहिती दिली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी देण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलवून घेतलं. तसंच कर्जमाफीबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी सल्लामसलत केली. 

पवारांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अजूनही मिळालेली नसल्याचं पंतप्रधानांना लक्षात आणून दिलं. तसंच राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचं नमूद केलं. यावेळी पवारांनी मोदींना पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं निमंत्रण दिलं.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात - पवार