मोदींच्या माफीची मागणी, मनमोहन यांना अमित शहांचे ५ प्रश्न

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 13, 2017, 09:46 PM IST
मोदींच्या माफीची मागणी, मनमोहन यांना अमित शहांचे ५ प्रश्न  title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचार संपत असतानाच मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीची मागणी केली. राजकीय फायदा उचलण्यासाठी मोदी खोटं बोलतायत आणि चिखलफेक करतायत, असा आरोप मनमोहन सिंग यांनी केला.

अमित शहांचा निशाणा

मनमोहन सिंग यांनी केलेल्या या आरोपांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनमोहन सिंग यांना अमित शहा यांनी ५ प्रश्न विचारले आहेत.

१ सध्या मनमोहन सिंग खूप नाराज आहेत. पण जेव्हा देशाची लूट होत होती तेव्हा मनमोहन सिंग यांचा राग देशाला दिसला नाही. मनमोहन सिंग यांच्यासमोरच भ्रष्टाचार होत होता तेव्हा त्यांना राग यायला हवा होता. अशा प्रकारच्या राजकारणाची मनमोहन सिंग यांच्याकडून अपेक्षा नाही, असं अमित शहा म्हणाले.

२ जेव्हा राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळानं काढलेला अध्यादेश फाडत होते, तेव्हा मनमोहन सिंग यांचा राग कुठे होता. तेव्हा मनमोहन सिंग यांना पंतप्रधान कार्यालयाच्या सन्मानाची चिंता नव्हती का, असा सवाल अमित शहांनी विचारला.

३ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कोट्यवधींचे घोटाळे झाले. राहुल गांधींनी अध्यादेश फाडला तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आठवली नाही का? याआधीही मनमोहन सिंग यांनी गुजरातमध्ये प्रचार केला. पण तेव्हा त्यांचा राग दिसला नाही. हा त्यांचा स्वभाव नाही. कदाचित आता त्यांच्यावर पक्षाकडून दबाव असेल, असा आरोप शहांनी केला.

४ सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हणल्या तेव्हा मनमोहन सिंग यांना राग का नाही आला? तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी संविधानिक पदावर होते, असं अमित शहा म्हणाले.

५ पाकिस्तानचे उच्चायुक्त आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेली बैठक काँग्रेसच्या रणदीप सुरजेवाला आणि आनंद शर्मा यांनी का नाकारली? बैठक झाल्याचं मान्य केल्यानंतर फक्त जेवणासाठीच भेटलो होतो, असं काँग्रेसनं सांगितलं. मग ही भेट लपवण्याच कारण काय होतं? मनमोहन सिंग यांनी याचं उत्तर देशाला द्यायला पाहिजे, अशी मागणी अमित शहा यांनी केली आहे.