नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांची दिल्लीत रात्री भेट झाली. परंतु भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भेटीला जाण्यापूर्वी गाना सुनने जा रहा हू हे सूचक वाक्य शाह बोलून गेले. यावरून गाणी म्हणजे राणेंचे गा-हाणे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिल्लीतल्या बैठकीतून भाजप प्रवेशाबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे नारायण राणे आता स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत राणे दस-याला घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरवण्यासाठी राणेंनी राजधानी दिल्लीची वारी केली. मात्र त्यांच्या हाती काहीही ठोस लागले नाही. राणेंनी यापूर्वीच घटस्थापनेला घेतलेल्या सिंधुदुर्गच्या पत्रकार परिषदेत दस-याला पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याची घोषणा केली आहे.
राज्यभर दौरा करणार असल्याचंही राणेंनी सांगितलं. या दौ-याच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांच्या समर्थनाची चाचपणी करणार आहेत. एवढंच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गटाची स्थापना त्यांनी यापूर्वीच केली आहे. त्यापार्श्वभूमीवर समर्थकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ नये आणि राजकीयदृष्टया अडचण होऊ नये यासाठी काहीतरी ठोस भूमिका घेणं राणेंना भाग आहे. त्यादृष्टीनंच ते वेगळा पक्ष स्थापन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.