"तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?", कोर्टाने 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना कडक शब्दांत फटकारलं

Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) हे फार गंभीर प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. तसंच सेन्सॉस बोर्डाने (Censor Board) याप्रकरणी नेमकं काय केलं? अशी विचारणा केली. जर आम्ही सहिष्णू आहोत, तर तुम्ही त्याचीही चाचणी घेणार का? असंही कोर्टाने विचारलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 28, 2023, 07:47 AM IST
"तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?", कोर्टाने 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना कडक शब्दांत फटकारलं title=

Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) संवादांवरुन निर्मात्यांना फटकारलं आहे. चित्रपटातील संवादावरुन प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग नाराज असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टात आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कोर्टाने सहलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिला आहे.

"चित्रपटातील संवाद हे फार मोठं प्रकरण आहे. आपल्यासाठी रामायण फार पवित्र आहे. लोक घरातून बाहेर पडताना रामचरित्र वाचतात," असं सांगताना कोर्टाने चित्रपटांनी काही विषयांना हात घालण्याची गरज नाही असं सांगितलं. 

"आम्ही आता या मुद्द्यावरही डोळे बंद करायचे का? याचं कारण या धर्मातील लोक फार सहिष्णू असल्याचं बोललं जातं. मग तुम्ही त्याची चाचणी घेणार का?," अशा शब्दांत कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. 

"हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली नाही हे बरं झालं. हनुमान आणि सीतामाता जणू काही नाहीच आहेत अशाप्रकारे दाखवण्यात आले आहेत. या गोष्टी फार सुरुवातीलाच काढून टाकायला हव्या होत्या. काही दृष्यं तर अडल्ट श्रेणीतील आहेत. असे चित्रपट पाहणं फार कठीण आहे," असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. 

कोर्टाने हे फार गंभीर प्रकरण आहे सांगताना सेन्सॉर बोर्डाने याप्रकरणी काय केलं? अशी विचारणा केली. यावर डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी कोर्टाला आक्षेपार्ह संवाद चित्रपटातून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती दिली. 

त्यावर कोर्टाने म्हटलं की "फक्त तेवढं करुन चालणार नाही. तुम्ही दृष्यांबाबत काय करणार आहात? आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही नक्कीच आम्ही जे हवं आहे ते करु. जर चित्रपटाचं स्क्रिनिंगच थांबवलं तर ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांना दिलासा मिळेल".

चित्रपटात डिस्क्लेमर जोडण्यात आल्याच्या प्रतिवादींच्या युक्तिवादावर खंडपीठाने म्हटले, "जे लोक डिस्क्लेमर टाकतात ते देशातील नागरिक, तरुण यांना अक्कल नाही असं समजतात का? तुम्ही प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, रावण, लंका हे सगळं दाखवा आणि मग हे रामायण नाही असं सांगता?"

"आम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचलं की, लोकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट बंद पाडला. त्यांनी तोडफोड केली हे नशीब समजा," असंही कोर्टाने म्हटलं. याप्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे.