अर्थसंकल्पापूर्वी मोदींनी घेतली अर्थतज्ज्ञ आणि उद्योजकांची भेट

सरकारने महसूली तूट किंवा महागाईची चिंता न करता केवळ अर्थव्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे.

Updated: Jun 23, 2019, 08:55 AM IST
अर्थसंकल्पापूर्वी मोदींनी घेतली अर्थतज्ज्ञ आणि उद्योजकांची भेट title=

नवी दिल्ली: संसदेत सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील आघाडीचे उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांची भेट घेतली. या बैठकीत कृषी, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य अशा महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार आर्थिक सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर उद्योजकांनी मोदींना अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर आणि रोजगारांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. या बैठकीला ४० अर्थतज्ज्ञ, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीला उपस्थित असणारे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी उद्योजकांची बाजू सरकारसमोर सविस्तरपणे मांडली. सरकारने महसूली तूट किंवा महागाईची चिंता न करता केवळ अर्थव्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी सरकारने अधिकाअधिक पैसे खर्च केले पाहिजेत व रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात झाली पाहिजे, असे एन. चंद्रशेखरन यांनी सरकारला सांगितले. 

याशिवाय, अर्थव्यवस्थेतील स्पर्धात्मकता वाढवणे, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता व उत्पन्न वाढवणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. या बैठकीपूर्वी उपस्थित तज्ज्ञांची त्यांच्या क्षेत्रानुसार पाच गटात विभागणी करण्यात आली होती.

या बैठकीला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, इंद्रजित राव आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तज्ज्ञांनी दिलेले सल्ले आणि सूचनांबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. 

येत्या ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी अर्थसंकल्पात कृषी आणि रोजगारासाठी कोणत्या तरतुदी असतील, याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.