पत्नी आणि 2 वर्षीय मुलीच्या बेडरुममध्ये सोडला कोब्रा, नंतर...; पतीचं कृत्य पाहून पोलीसही हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती गणेश पात्रा याचे पत्नीसह वाद सुरु होते. यावरुनच त्याने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट आखला.  

शिवराज यादव | Updated: Nov 24, 2023, 12:07 PM IST
पत्नी आणि 2 वर्षीय मुलीच्या बेडरुममध्ये सोडला कोब्रा, नंतर...; पतीचं कृत्य पाहून पोलीसही हादरले title=

पत्नी आणि मुलीच्या बेडरुममध्ये कोब्रा सोडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना ओडिशात घडली आहे. गंजम जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. गणेश पात्रा असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती गणेश पात्रा याचे पत्नीसह वाद सुरु होते. यावरुनच त्याने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट आखला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आरोपी गणेश पात्रा यांनी एका सर्पमित्राकडून कोब्रा मिळवला होता. 7 ऑक्टोबरला त्याने पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या खोलीत कोब्रा सोडला. कोब्राने माय-लेकीला दंश केला होता. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांना त्यांना रुग्णालयात आणताच मृत घोषित केलं होतं. 

सापाने दंश केला असल्याने पोलिसांना हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचं वाटलं होतं. पण जेव्हा गणेश पात्रा याच्या सासऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांना तपास सुरु केला आणि धक्कादायक घटनाक्रम उलगडला. तपासादरम्यान पोलिसांना गणेश पात्राने एका सर्पमित्राकडून कोब्रा घेतल्याची माहिती मिळाली. यानंतर पुढील गोष्टी उलगडल्या आणि आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस सर्पमित्राचाही चौकशी करणार आहेत. 

पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "त्या रात्री कुटुंबीयांनी सापाला ठेचून मारलं होतं आणि दोघींना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं. महिलेच्या वडिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारे आम्ही तपास सुरु केला होता. तपासादरम्यान आम्हाला पती गणेश पात्रा याने एका सर्पमित्राकडून कोब्रा घेतल्याची माहिती मिळाली. त्या सर्पमित्राचीही चौकशी केली जाणार आहे". पोलिसांनी आरोपी पती गणेश पात्रा याला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.