Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये आजवर अनेक नावं, अनेक संस्था मोठ्या झाल्या. शुन्यातून उभं राहिलेलं विश्व इतकं मोठं झालं ती पाहता पाहता अनेक संस्थांची ख्याती संपूर्ण जगात पसरली. याच नावाजल्या गेलेल्या संस्थांमधील एक नाव म्हणजे, टाटा उद्योग समूह. (TATA Group)
रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला नवी झेप घेण्याचं बळ दिलं आणि त्यांच्या प्रयत्नांनी या उद्योग समुहानं प्रचंड प्रगती केली. वयाच्या 85 व्या वर्षीसुद्धा रतन टाटा त्यांच्या परीनं संस्थेत योगदान देताना दिसतात आणि राहिला प्रश्न त्यांचा हा संपूर्ण अब्जावधींचा व्यवसाय पुढे नेणार कोण? याबाबतचा तर, आता तेसुद्धा स्पष्ट झालं आहे.
रतन टाटा यांचे धाकटे बंधू, नोएल टाटा यांच्या मुली लिआ आणि माया टाटा यांच्या हाती टाटा उद्योग समुहाची सूत्री जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोविल टाटाचं नावही यामध्ये पुढे येत आहे. माध्यमं आणि प्रसिद्धीपासून दूर असणारे हे तिघंही सध्या रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रातील बारकाव्यांविषयी माहिती घेत आपल्या ज्ञानात भर टाकत आहेत. भविष्यात या विस्तारलेल्या व्यवसायाची धुरा सांभाळण्याच्याच दृष्टीनं त्यांना तयार केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.
लिआ, माया आणि नोविल यांना 2022 मध्येच टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. येत्या काळात त्यांच्याकडेच या अंदाजे 3800 कोटी रुपयांच्या व्यवसायाची महत्त्वाची जबाबदारी जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
नोएल टाटा यांची सर्वात थोरली मुलगी, लिआ टाटा समुहाचतील हॉटेल इंडस्ट्रीचा व्यवहार पाहते. ताज रिसॉर्ट्स एंड पॅलेसेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून तिनं या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. तिथं अनुभव घेतल्यानंतर टाटा ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्सवर नजर ठेवण्याऱ्या युनिटमध्ये तिनं महत्त्वाची जबाबदारी हाती घेतली.
लिआची धाकटी बहीण माया टाटा हिनं रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर अपॉर्चुनिटीज फंडमधून करिअरची सुरुवात केली. पोर्टफोलिओ मॅनेजर आणि इन्वेस्टर रिलेशन रिप्रेजेंटेटिव्ह म्हणून तिनं काम केलं. हल्लीच तिनं टाटा कॅपिटलमधील कामकाज संपवून टाटा डिजिटलवर लक्ष केंद्रीत केलं.
या दोघींचाही धाकटा भाऊ, नोविल टाटा सध्या ट्रेंट हायपरमार्केट प्रायवेट लिमिटेडमध्ये प्रमुखपदी काम करत आहे. ही कंपनी टाटा समुहातील विविध ब्रँड्च्या व्यवस्थापनाचं काम पाहते.