Madhya Pradesh Suicide News: मध्य प्रदेशातील सटणा येथे एका व्यक्तीने आर्थिक चणचणीला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर उपचार करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्यांनी आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं. पाच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर मुलीला चालता येत नव्हतं. तिच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. पण योग्य उपचार करु शकत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली.
अनुष्का गुप्ताने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी आपल्यावर उपचार करण्यासाठी आपलं घर, दुकान विकलं होतं. घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत होते. रस्ते अपघातात अनुष्काच्या पाठीच्या कण्याला मार लागला होता. तेव्हापासून अनुष्का अंथरुणाला खिळून होती.
घरात गॅस सिलेंडर आणण्यासाठी आणि अन्न मिळावं यासाठी प्रमोद यांनी अनेकदा रक्तदान करत पैसै मिळवले होते असं कुटुंबाने सांगितलं आहे. रक्त विकल्यानंतर आणि पैसे कमवण्यात असमर्थ ठरल्यानंतर आपले वडील आजारी पडले होते असं अनुष्काने सांगितलं आहे.
17 वर्षीय अनुष्का अभ्यासात फार हुशार आहे. अंथरुणाला खिळून असतानाही लेखकाच्या सहाय्याने तिने परीक्षा देत बोर्डात चांगले मार्क मिळवले होते. पण आपल्याला प्रशासनाने कोणतीच मदत केली नसल्याचं अनुष्का सांगते. "प्रशासनाने काही योजनांतर्गत मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण गेल्या एक वर्षात काहीच मदत मिळाली नाही. माझे वडील मदत मिळावी यासाठी चकरा मारत राहिले," असं अनुष्काने सांगितलं आहे.
"माझ्या वडिलांनी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी रक्तही विकलं. पण अखेर आर्थिक संकटाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली," अशी माहिती अनुष्काने दिली आहे.
प्रमोद गुप्ता पहाटे 4 वाजता दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. शोध घेऊनही सापडत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सटणा येथे रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला होता. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.