उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तब्बल 700 किमी प्रवास केला. पण जेव्हा त्यानंतरही प्रियकराने बोलण्यास नकार दिला तेव्हा मात्र प्रेयसीने ब्लेडने आपला हात कापला. यानंतर तिने थेट पोलीस स्थानक गाठलं.
मोठ्या प्रमाणात रक्त गेलं असल्याने तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर लगेचच बेशुद्ध पडली. सध्या तिची प्रकृती फार गंभीर आहे. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. हे प्रकरण मंगलपूर ठाण्याच्या झिंझक येथील आहे.
येथील एक तरुण मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात खासगी कंपनीत नोकरी करतो. तिथे एका अल्पवयीन तरुणीशी त्याची मैत्री झाली होती. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं होतं. पण तरुण नंतर पुन्हा झिंझकमध्ये परतला होता. तरुणाच्या कुटुंबाला त्याच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला मुलीशी बोलण्यापासून रोखलं होतं. कुटुंबीयांनी दिलेला आदेश पाळत तरुणाने आपल्या प्रेयसीशी बोलणं बंद केलं होतं.
फार प्रयत्न करुनही प्रियकर बोलत नाही हे लक्षात आल्यावर प्रेयसीने त्याच्या घऱी जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी ती आफल्या प्रियकराला शोधण्यासाठी इंदूरपासून 700 किमी दूर असणाऱ्या उत्तर प्रदेशातील कानपूर देहातला पोहोचली. प्रेयसी घऱी पोहोचली असता तरुणाने तिच्याशी बोलण्यास नकार दिला. यानंतर प्रेयसी संताली आणि तिने ब्लेडने आपल्या हाताच्या नसा कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हातावर ब्लेडने सपासप वार केल्यानंतर तरुणीने त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं. रक्ताने माखलेल्या तरुणीला पाहून पोलिसांनाही धक्का बसला होता. याचवेळी तरुणी बेशुद्ध पडली. यानंतर पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वाट न पाहताच तिला रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयात उपचारानंतर तरुणीला शुद्ध आली असता पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. पोलिसांना घाबरुन मुलगी रुग्णालयातून बेपत्ता झाली आहे. आता पोलीस तिचा शोध घेत आहेत. सोबतच ज्या तरुणामुळे तिने हे पाऊल उलललं त्याचीही पोलीस चौकशी करत आहेत.