तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला

Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 27, 2024, 02:36 PM IST
तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला title=

Crime News: उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात 16 वर्षाच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन 60 वर्षाच्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीला एकूण 8 मुली आहेत. त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आपली 16 वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर आरोपी पिता संतापला होता. त्याने मुलीला बाळाच्या वडिलांचं नाव विचारलं असता तिने पीडित व्यक्तीचं नाव घेतलं होतं. यानंतर मुलीच्या बापाने कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला. मानेवर कुऱ्हाड लागल्याने 60 वर्षीय पीडित गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत तात्काळ झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान शुक्रवारी पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला. मेडिकल कॉलेज ठाण्यातील पोलिसांनी मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर नातेवाईकांकडे सोपवला आहे.

रामआसरे कुशवाह असं पीडित व्यक्तीचं नाव असून, ते हमीरपूरच्या जलालपूर ठाणे क्षेत्रात येणाऱ्या न्यूलीवासा गावात राहायचे. त्यांचा जावई बृजेंद्र कुशवाह यांनी सांगितलं आहे की, 'माझे सासरे शेतकरी होते. आमच्या परिसरातील 16 वर्षांची मुलगी गरोदर झाली होती. तिच्या कुटुंबाने 1 जानेवारीला तिचा गर्भपात केला. पोटातलं मूल रामआसरे यांचा असल्याचा आरोप होता. आम्हाला हे समजल्यानंतर तेव्हा न्यूलीवासा गावात पोहोचलो. आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी नकार दिला. मूल आपलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी पोलीस तक्रार करण्यास नकार दिला. तसंच पंचायत बोलावण्यासही नकार दिला. ना सासऱ्यांनी तक्रार केली ना मुलींच्या घरच्यांनी केली'.

कुऱ्हाडीने वार करुन केली हत्या

दुसऱ्या जावई अरविंदने सांगितलं की, अफवेनंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या मनात माझ्या सासऱ्यांविरोधात राग होता. 21 जानेवारीच्या सकाळी सासरे घराबाहेर उभे होते. तेव्हा मुलीचा वडील कुऱ्हाड घेऊन आला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्याने कुऱ्हाडीने गळ्यावर वार केला. वाचवण्यासाठी आलेला सासूवरही हल्ला केला. जखमी झाल्याने सासरे जमिनीवर खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी आधी सरीला आणि नंतर उरईला नेलं. तिथून डॉक्टरांनी त्यांना झाशी मेडिकल कॉलेजला रेफर केलं. तिथे उपचारादरम्यान त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.