तिरुवनंतपुरम : केरळमधील अलापुझा जिल्ह्यातील 96 वर्षाच्या वृद्ध महिलेने परीक्षेमध्ये 100 पैकी 98 गुण मिळवले आहेत. कार्तियानी अम्मा यांनी अक्षरलक्ष्म साक्षरता प्रोग्रामनुसार झालेल्या परीक्षेत या वृद्ध महिलेने मोठं यश मिळवलं आहे. परीक्षेत वाचणे, लिहिणे आणि गणित यावर प्रश्न विचारले जातात. केरळ स्टेट लिटरेसी मिशनच्या अंतर्गत ऑगस्टमध्ये ही परीक्षा झाली होती.
या परीक्षेला जवळपास 42933 जण पास झाले आहेत. अम्मा या परीक्षेला बसणाऱ्या सर्वात वृद्ध महिला आहेत. जेव्हा अम्मा चेप्पाडमध्ये एका शाळेत पोहोचल्या. तेव्हा तेथील सर्व उपस्थितांनी त्यांच्या या धाडसाला प्रणाम केला. अम्माने स्वत: या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी अभ्यास देखील केला. अम्मा केरळमध्ये सर्वात जास्त वयात साक्षर झालेल्या महिला बनल्या आहेत.
अम्मांनी म्हटलं की, पुन्हा वाचणे आणि लिहिण्याची त्यांची इच्छा तेव्हा जागृत झाली जेव्हा त्यांच्या 60 वर्षाच्या मुलीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. अम्मा यांना जेव्हा साक्षरता मिशनबाबत माहिती झाली तेव्हा त्यांनी यासाठी अर्ज केला आणि मेहनत करुन अभ्यास केला आणि मोठं यश देखील मिळवलं. विशेष म्हणजे 90 वर्षाच्या जवळपास 30 लोकांनी देखील या परीक्षेसाठी अर्ज केला होता आणि अभ्यास देखील केला.