प्रसूतीसाठी आलेल्या 80 महिला निघाल्या HIV पॉझिटिव्ह, 35 जणींची डिलिव्हरीही झाली; डॉक्टर हैराण

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) गेल्या 16 महिन्यात प्रसूतीसाठी आलेल्या तब्बल 60 ते 80 महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. हा आकडा समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात तपास करण्यासाठी आता एक समितीच गठीत करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 5, 2023, 11:56 AM IST
प्रसूतीसाठी आलेल्या 80 महिला निघाल्या HIV पॉझिटिव्ह, 35 जणींची डिलिव्हरीही झाली; डॉक्टर हैराण title=

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एका प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. येथील लाला लजपतराय मेडिकल कॉलेजात (Lala Lajpat Rai Medical College) प्रसूतीसाठी आलेल्या तब्बल 60 ते 80 महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मेरठ मेडिकल कॉलेज आणि जिल्हा आरोग्य विभाग या संपूर्ण प्रकारावर नजर ठेवून आहेत. रेकॉर्डनुसार, 16 महिन्यात तब्बल 60 ते 80 गर्भवती महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. या महिलांवर एआरटी सेंटरच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत.  

सर्व महिलांवर उपचार सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या महिलांना औषधोपचार दिले आहेत. सर्व महिला आणि मुलांची प्रकृती चांगली आहे. यामधील 35 महिला अशा आहेत, ज्यांची प्रसूती झाली आहे. पण मेरठ वैद्यकीय प्रशासन आणि जिल्हा मुख्य आरोग्य अधिकारी यांनी नेमक्या किती मुलांचा जन्म झाला आहे, याची माहिती दिलेली नाही. 

मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजचे एआरटी म्हणजेच, एंटी रेट्रोव्हायरल थेरपी सेंटरनुसार 16 महिन्यात आतापर्यंत 81 महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. यामधील 35 महिला आधीपासून या रोगाने त्रस्त होती. 

2022-2023 मध्ये एकूण 33 नव्या महिला सापडल्या आहेत. यावर्षी जुलैपर्यंत 13 गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. पण लाला लजपत राय मेडिकल कॉलेज प्रशासन यासंबंधी काही बोलण्यास तयार नाही. 

एआरटी सेंटरच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांच्या बाळांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. बाळ 18 महिन्याचं झाल्यानंतर त्याची चाचणी केली जाते. यानंतर ते एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत, की निगेटिव्ह हे स्पष्ट होईल. 

मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अखिलेश मोहन यांनी सांगितलं की, जवळपास 60 महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मेडिकल कॉलेजच्या रिपोर्टनुसार, या महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. यामधील काही महिला या प्रसूतीनंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. 

त्यांनी सांगितलं की, गर्भवती महिलांची वैद्यकीय तपासणी होते जेणेकरुन त्यामधील कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्यासंबंधी उपचार केले जाऊ शकतील. त्यांच्यासाठी वेगळा वॉर्ड आहे. सर्व महिला आणि मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून, यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. रिपोर्ट आल्यानंतरच या महिलांना एचआयव्हीची लागण कशी झाली याची माहिती मिळेल.