Ratan Tatat Love Story : रतन टाटा.... एक असं व्यक्तिमत्त्वं जे अनेकांच्याच आदर्शस्थानी आहे आणि ज्या व्यक्तीनं भारतीय उद्योग जगतामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. एका संस्थेशी बांधील राहून त्या संस्थेप्रती आणि तिथं काम करणाऱ्या प्रत्येकाप्रती आपली जबाबदारी ओळखत रतन टाटा यांनी कायमच अनेकांची मनं जिंकली. या व्यक्तीच्या मनाची हळवी बाजू नुकतीच सर्वांसमोर आली आहे. जिथं रतन टाटा, यांनी त्यांच्या प्रेमाचं नातं सर्वांसमोर आणलं.
Humans of Bombay शी संवाद साधताना टाटा यांनी त्यांची प्रेमकहाणी पहिल्यांदाच मोकळ्या मनानं सर्वांसमोर आणली. जीवनात एखाद्या व्यक्तीचं येणं किती महत्त्वाचं असतं हेच टाटा यांच्या बोलण्यातून, त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झालं. 'तिच्यासारखं दुसरं कोणी परत कधीच आपल्याला भेटलं नाही, जिला पत्नी म्हणू शकू...', असंही ते म्हणाले आणि त्यांच्या जीवनात 'त्या' व्यक्तीचं स्थान नेमकं किती महत्त्वाचं हे लगेचच लक्षात आलं. प्रेमाच्या नात्याविषयी रतन टाटा बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण, लग्नाबाबतचा खुलासा त्यांनी पहिल्यांदाच केल्याचा दावा केला जात आहे.
'लॉस एंजेलिसमध्ये माझं लग्न जवळपास झालंच होतं. पण, प्रत्यक्षात मात्र...मी माझ्या आजीसोबत भारतात आलो. जिच्याशी माझं लग्न होणार होतं तीसुद्धा भारतात येणार होती. पण, याचदरम्यान 1962 मध्ये भारत आणि चीनचं युद्ध सुरु झालं आणि त्या मुलीच्या पालकांनी तिला भारतात येण्याची परवानगी दिली नाही', असं टाटा म्हणाले. पुढे दिवसांमागून दिवस उलटले आणि रतन टाटा त्यांच्यात्यांच्या कामात व्यग्र झाले.
'ती' भारतात आली नाही, आयुष्य पुढे जात राहिलं. रतन टाटा यांच्या आयुष्यात नव्यानं प्रेम आलं, काही खास व्यक्तीही आल्या. पण, 'पत्नी' म्हणू शकू असं कोणी परत भेटलंच नाही ही मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली. जीवनात बरेच चढ-उतार आले असं म्हणत मी सातत्यानं प्रवास करत राहिलो, कामात गुंतलो. इतका की माझ्याकडे स्वत:साठीही वेळ उरला नव्हता हे वास्तव सर्वांपुढे आणलं. जीवनात इतक्या गोष्टी पाहिल्या की, आता मागे वळून पाहिल्यास खंत वाटत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रतन टाटा यांच्या आयुष्याचे अनेक पैलू सर्वांपुढे आले आहेत. आजवरच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये त्यांनी जीवनातील काही किस्से आणि प्रसंग मोकळेपणानं सर्वांसमोर आणले. ज्यानिमित्तानं त्यांच्या भूतकाळात डोकावण्याची संधी अनेकांनाच मिळाली. आई- वडिलांच्या घटस्फोटानंतर रतन टाटा यांचा सांभाळ त्यांच्या आजीनं केला. लॉस एंजेलिसमध्ये शिक्षणानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तो आपल्या जीवनातील रम्य काळ होता असं रतन टाटा कायम सांगतात.