'मृत्यूनंतर काय होतं?', आई आणि भावाने Royal Enfield विकल्यानंतर विद्यार्थ्याने Google वर केलं सर्च; नंतर बंदूक उचलली अन्...

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गुगलवर 'एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेमकं काय होतं?' असं सर्च केलं आणि नंतर आपलं जीवन संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 13, 2025, 05:54 PM IST
'मृत्यूनंतर काय होतं?', आई आणि भावाने Royal Enfield विकल्यानंतर विद्यार्थ्याने Google वर केलं सर्च; नंतर बंदूक उचलली अन्... title=
(प्रातिनिधिक फोटो)

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आई आणि मोठ्या भावाने रॉयल एनफिल्ड बाईक विकल्याने हा अल्पवयीन तरुण नाराज होता. मुलाने मित्रांसह उगाच फिरत बसू नये यासाठी आई आणि भावाने बाईक विकली होती. याच संतापाच्या भरात त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितलं आहे की, नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर 'मृत्यूनंतर व्यक्तीसह काय होतं?' असं सर्च केलं होतं. 

11 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. मुलाचा मोठा भाऊ मेरठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून त्यांच्या आईला घेण्यासाठी गेला होता. दरवाजा आतून बंद होता आणि त्यांना मोठा आवाज ऐकू आला. दरवाजा बंद असल्याने आई आणि भावाने खिडकीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी खिडकीतून आत पाहिलं असता रक्ताचा सडा पडला होता. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला पोहोचताच मृत घोषित केलं. 

पोलिसांनी सांगितले की, मुलाची आई मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये परिचारिका आहे आणि त्याचा मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले. 17 वर्षीय मुलाचे अभ्यासावर लक्ष नव्हते आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याला मित्रांसोबत दुचाकीवरून फिरत असल्याबद्दल अनेकदा फटकारायचे.

मुलाने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावं यासाठी कुटुंबाने दुचाकी विकण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे तो संतापला आणि आत्महत्या करत जीवन संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कुटुंबाने याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान पोलिसांनी .315 बोरची देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली आहे. मुलाला ही बंदूक कशी मिळाली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.