अजबच..! अंबाजोगाईत जन्मले दोन तोंडाचे बाळ

अंबाजोगाई येथील स्वाती वैद्यकीय महाविद्यालयाला महिलांची प्रसूती हा विषय नवीन नाही. पण, येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा हा विभागही एका हटके प्रसूतीमुळे अवाक झाला. इथे एका मातेने चक्क दोन तोंडाच्या बाळाला जन्म दिला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 30, 2017, 04:09 PM IST
अजबच..! अंबाजोगाईत जन्मले दोन तोंडाचे बाळ title=

 बीड : अंबाजोगाई येथील स्वाती वैद्यकीय महाविद्यालयाला महिलांची प्रसूती हा विषय नवीन नाही. पण, येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा हा विभागही एका हटके प्रसूतीमुळे अवाक झाला. इथे एका मातेने चक्क दोन तोंडाच्या बाळाला जन्म दिला.

 घटना आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील. इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात एक महिला प्रसूतीसाठी आली. महिलेला प्रसूतीसाठी प्रसूती कक्षात घेण्यापूर्वी डॉक्टरांनी संबंधीत सर्व कागदपत्रं तपशीलाने तपासून घेतली. त्यात महिलेच्या गर्भाशयात असलेलं बाळ हे सर्वसामान्य नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं. प्रसूतीवेळी येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन डॉ. संजय बनसोडे यांनी त्यांच्या सरकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. आणि डॉक्टरांचा एक चमू महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी कार्यरत झाला. अखेर सर्व सोपस्कर पार पाडून डॉक्टरांनी महिलेची प्रसूती पार पाडली. महाविद्यालय आणि रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी २९ ऑक्टोबरला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी महिलेने या बाळाला जन्म दिला.

 दरम्यान, अत्यंत किचकट आणि तितकीच जोखमीची अशी ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी पार पाडली. सध्या बाळ आणि बाळंतीन असे दोघेही सुखरूप आहेत. मात्र, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांचे पथक लक्ष ठेऊन आहे. तसेच, त्यांच्यावर विविध उपचारही सुरू आहेत.

 प्राप्त माहितीनुसार, बाळाचे वजन हे ३ किलो ७०० ग्रॅम इतके आहे. हे बाळ सर्वसामान्य बाळांसारखे नाही. तर, असामान्य असलेल्या या बाळाला चक्क दोन डोकी, दोन किडणी दोन फुफ्फुसे आहेत. मात्र, विशेष असे की, या बाळाला इतर अवयव मात्र एक-एकच आहेत.

 एकाच रूग्णालयातील दुसरी घटना

 या महाविद्यालयात अशा प्रकारचे बाळ जन्माला येण्याची ही पहिलीच घटना नाही. तर, २०१४मध्ये याच वैद्यकीय महाविद्यालयात २०१४ मध्ये एका महिलेने अशा प्रकारे एका बाळा जन्म दिला होता. मात्र, तेव्हा हे बाळ फार काळ जगू शकले नाही. अल्पावधीतच त्याचा मृत्यू झाला.

 या वेगळ्या घटनेबाबत बोलानात डॉ. संजय बनसोडे म्हणतात,  अशा असामान्य बाळाच्या आयुष्याबद्दल खात्रीपूर्वक काहीही सांगता येत नसले तरी अशी असामान्य बाळे अनेक वर्षे जगत असल्याचीही अनेक उदाहरणे वैद्यकीय शास्त्र अभ्यासात आढळून आले आहे.