मुंबई : देशातील पहिली पूर्णतः स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सीनला लवकरच WHOच्या आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, या मंजूरीसाठी कंपनीने गरजेची असलेली सर्व कागदपत्र WHOकडे सोपवली आहेत. त्यामुळे आता लवकरच कोव्हॅक्सिन ही भारतीय लस WHOच्या आताप्कालीन वापराच्या यादीत येण्याची शक्यता आहे.
भारत बायोटेकने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, लवकरच WHOकडून Covaxinला आपात्कालीन वापरासाठी मंजूर मिळणार असल्याची शक्यता आहे. सगळे ट्रायल्स, टेस्टिंग आणि रिझल्टशी निगडीत सगळी कागदपत्र WHOकडे जमा करण्यात आली आहेत. यानंतर कंपनीला अशी आशा आहे की WHOच्या यादीमध्ये Covaxinचा समावेश केला जाईल.
आतापर्यंत WHOने फायझर, कोविशिल्ड, मॉडर्ना, जैनसेन, एस्ट्राजेनेका आणि सिनोफॉर्म या लसींना आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिलेली आहे. तर भारतात करोडो लोकांनी घेतलेली लस Covaxin आपात्काली वापराच्या यादीबाहेर आहे.
WHOच्या प्रमुख संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या सांगण्यानुसार, कोणत्याही औषधाचा EULमध्ये समावेश करण्यापूर्वी एका खास प्रक्रियेचं पालन करावं लागतं. याअंतर्गत कंपनीला लसीच्या चाचणीचे तीनही टप्पे पूर्ण करावे लागतील आणि डब्ल्यूएचओच्या नियामक विभागाकडे डेटा सादर करावा लागेल.
यानंतर, डब्ल्यूएचओची तज्ज्ञ सल्लागार या डेटाची तपासणी करतात. चाचणी दरम्यान, औषधाची सुरक्षा, कार्यक्षमता, उत्पादन गुणवत्ता, मानकं इत्यादींची तपासणी केली जाते. डॉ सौम्या पुढे म्हणाल्या, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा ईयूएलमध्ये समाविष्ट करण्याच्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.