मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबईत जवळपास 94 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती आहे. तर आता दिवाळीपूर्वी पहिली डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 100 टक्के होण्यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.
मुंबईत लसीकरणाचा वेग कमालीचा वाढण्याचं उद्दीष्ट मुंबई महापालिकेने ठेवलंय. दिवाळीपूर्वी 100 टक्के मुंबईकरांचा पहिला डोस पूर्ण करण्याचं टार्गेट आहे. मुंबई सध्या 94% नागरिकांचा पहिला डोस झालाय. तर 53% मुंबईकरांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत. विभागांतील झोपडपट्टय़ा, काही इमारतींच्या आवारात आवश्यकतेनुसार लसीकरण शिबिरं आयोजित करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या. इतकंच नाही तर लसीकरणासाठी फिरत्या रुग्णवाहिकाही पालिकेने सज्ज केल्यात.
सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे लसीच्या दुसऱ्या डोसाचं लसीकरण मोठय़ा प्रमाणात होताना दिसतंय. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसांनी घ्यावा लागतो. यामुळे बहुतांश नागरिकांचा अजूनही दुसरा डोस घ्यायचा राहिला आहे.
दरम्यान तज्ञांच्या मते, भारतातील कोरोना आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतोय. सध्याची परिस्थिती पाहता, कोविड -19ची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आता SARS-CoV-2 विषाणूचे फक्त डेल्टा आणि त्याचं व्हेरिएंट पसरत आहे. महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्समध्ये समाविष्ट असलेले डॉ. शशांक जोशी म्हणतात, "तिसरी लाट कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. जर कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला तर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.