वॉशिंग्टन : किडनी निकामी झालेल्या जगातील लाखो लोकांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागतो. मात्र किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी आता एक क्रांतिकारी पद्धत शोधली आहे. ज्यामुळे जगातील लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
द सनच्या अहवालानुसार, अमेरिकेत, जगात प्रथमच मानवी शरीरात डुक्कराची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया न्यूयॉर्क शहरातील एनवाययू लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी केली आहे. प्रत्यारोपणानंतर, डुक्कराची किडनी रुग्णाच्या शरीरात योग्यरित्या कार्य करत असल्याचंही समोर आलं आहे.
शस्त्रक्रियेत सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या पॅनेलचे प्रमुख डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, ज्या रुग्णाला डुकराची किडनी प्रत्यारोपण केली गेली तो रूग्ण ब्रेन डेड होता. त्याचं हृदय आणि इतर अवयव अजूनही कार्यरत आहेत. त्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची परवानगी घेतल्यानंतर, डॉक्टरांनी ही दीर्घकाळ शस्त्रक्रिया केली.
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी 2-3 दिवस सतत रुग्णावर लक्ष ठेवलं. रुग्णाच्या शरीराने डुक्कराच्या किडनी स्विकारल्यावर डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. त्या किडनीने शरीरात निर्माण होणाऱ्या टाकाऊ गोष्टी यशस्वीरित्या फिल्टर केल्या. किडनीने रुग्णाच्या शरीरात तितकीच युरीन तयार केली जितकी मानवी किडनीमार्फत तयार होते.
अहवालानुसार जगात मानवी अवयवांची मोठी कमतरता आहे. यामुळे दररोज हजारो रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. ही कमतरता दूर करण्यासाठी विविध देशांतील शास्त्रज्ञ डुकरावर बराच काळ संशोधन करत आहेत. आतापर्यंतच्या संशोधनात असं आढळून आलंय की, डुकराच्या पेशींमध्ये साखरे असते आणि यामुळे मानवी शरीर ते स्वीकारत नाही.
यानंतर, डॉक्टरांनी स्पेशल मोडिफाइड जीन असलेल्या डुकराचा वापर केला. त्या डुकराच्या पेशीमध्ये असलेली साखर काढून टाकण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला टाळण्यासाठी काही अनुवांशिक बदल करण्यात आले. यानंतर त्याची किडनी काढून ती ब्रेन-डेड रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली.