Men's Health- पुरुषांनो सावधान! वाढत्या वयानुसार उद्भवू शकतात या समस्या

या 5 समस्यांकडे पुरूषांनी दुर्लक्ष करू नये

Updated: Jun 13, 2021, 06:50 PM IST
Men's Health- पुरुषांनो सावधान! वाढत्या वयानुसार उद्भवू शकतात या समस्या title=

मुंबई : पुरूषाचं जसं वय वाढतं तसे काही ठराविक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. एका विशिष्ठ वयानंतर पुरुषांमध्ये काही समस्या सामान्यपणे दिसून येतात. यापैकी सर्वात सामान्यपणे दिसून येणाऱ्या समस्या युरिनरी ट्रॅक्ट सिस्टीम म्हणजेच मूत्राशयासंदर्भातील समस्या. या समस्यांसाठी युरॉलॉजीस्ट म्हणजेच मुत्रविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

या 5 समस्यांकडे पुरूषांनी दुर्लक्ष करू नये

इरेक्टाईल डिस्फंक्शन

इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे पुरुष सेक्स करतेवेळी उद्भवणारी लिंगाची समस्या. ४० ते ७० वर्षे वयोगटातल्या ३० ते ५० टक्के पुरूषांना या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे पुरुषांची लैंगिक इच्छा देखील कमी होते. हायपरटेन्शन, लठ्ठपणा, मूत्रपिंडाच्या समस्या (रिनल फेल्युअर) या आजारांचं हे एक लक्षणंही असू शकतं. त्यामुळे वेळीच युरॉलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वेळीच यावर उपचार करणं फायदेशीर ठरतं. पुरूषांनी या समस्यांबाबत चर्चा करण्यात लाज बाळगू नये.

लघवी लीक होणं

ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडर (ओएबी) किंवा युरिनरी इनकॉन्टिनन्स (यूआय) हा आजार स्त्रिया किंवा पुरूष दोघांनाही नकोसा वाटतो. वाढत्या वयातील 11 ते 16 टक्के पुरूषांमध्ये ही समस्या आढळून येते. प्रोस्टेट या ग्रंथीचा आकार वाढला की ही समस्या उद्भवू शकते. यामुळे मूत्रमार्गातून वाहणाऱ्या लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. मूत्राशयाच्या स्नायूंना दुखापत झाल्यानेही हा आजार होण्याची शक्यता असते. जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय उपचार याद्वारे हा आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

लघवीतून रक्त येणं

लघवीतून रक्त येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकते. कर्करोग जरी नसेल तरी डॉक्टरांकडून यावर उपचार गेणं गरजेचं आहे. त्यासाठी लघवीच्या चाचण्या, क्ष-किरण, सीटी स्कॅन किंवा सिस्टोस्कोपी या पद्धतींचा वापर करण्यात येतो. लघवीद्वारे रक्त पडण्याची समस्या बंद-सुरू होत असेल तरीही या समस्येवर उपचार घेणं आवश्यक आहे.

टेस्टिकल - लिंगाच्या खालच्या भागात वेदना किंवा गाठी होणं

दोनापेक्षा अधिक आठवडे जर लिगांच्या खालील भागात वेदना जाणवत असेल किंवा त्या ठिकाणी गाठ घट्टपणा वाटत असेल तर त्वरित युरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. हे टेस्टिक्युलरच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं गरजेचं आहे. कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर तो बरा होऊ शकतो.

लघवी करताना त्रास होणं

बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होणं ही समस्या अनेकदा आढळून येते. यामध्ये व्यक्तीला लघवी करताना  वेदना होतात. वयस्कर पुरूषांमध्ये यामागचे सामान्य कारण असतं. वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढला की ही तक्रार उद्भवते.