मुंबई : भारतात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र या दरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी बनावट कोरोना लसीची प्रकरणंही समोर आली आहेत. अशा बाबींवर कारवाई करण्यासाठी सरकार प्रशासनाबरोबरच सामान्य लोकांनाही जागरूक करण्यात येत आहे. देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिकच्या कोरोना लस कशा ओळखायच्या याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत.
सामान्य लोकांना कोरोना लस खरी आहे की बनावट याची खात्री लगेच करू शकत नाही. परंतु लस पुरवण्याचं काम पाहणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे नक्कीच मदत होईल.
अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांच्या वतीने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव तसंच प्रधान सचिव यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना लस वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक प्रमाणित करणं आवश्यक आहे. यासोबतच, खरी कोरोना लस ओळखण्यासही सांगण्यात आले आहे.