शू बाईट झाल्यास करा हे '६' घरगुती उपाय!

अनेकदा नवीन चप्पल किंवा सॅंडल घातल्याने पायाला इजा होते.

Updated: Aug 24, 2018, 12:55 PM IST
शू बाईट झाल्यास करा हे '६' घरगुती उपाय! title=

मुंबई : अनेकदा नवीन चप्पल किंवा सॅंडल घातल्याने पायाला इजा होते. पायाची त्वचा निघते, जळजळ होते. चप्पल, सॅंडल घालून चालणे कठीण होते. याचा अनुभव तुम्हीही नक्कीच घेतला असेल. अशावेळेस पाय ओलसर राहिल्यास अल्सर होण्याची शक्यता वाढते. यावर काही सोपे घरगुती उपाय कामी येतील. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तर तुम्ही करुन पाहा हे घरगुती उपाय..

कोरफड

कोरफड बहुगुणी आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे शू बाईट झाल्यानंतर त्यावर कोरफड जेल लावा. त्यामुळे सूज कमी होऊन जळजळीवर आराम मिळेल. त्याचबरोबर याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कोरफड जेल पूर्णपणे सुकल्यावर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा. अधिक चांगल्या परिणामांसाठी कोरफड जेल दिवसातून दोनदा लावा. 

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यातील अॅंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॉमिन्स वेदना, सूज कमी करतात. गरम पाण्यात ग्रीन टी आणि बेकिंग सोडा घाला. टी बॅग थंड झाल्यावर काही वेळ शू बाईट झालेल्या ठिकाणी लावा. बेकिंग सोड्यातील अॅँटीसेप्टीक गुणधर्मांमुळे इंफेक्शनला आळा बसतो. असे दिवसातून २-३ वेळा करा. लवकर आराम मिळेल.

मीठ

शू बाईटमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी थंड पाण्यात मीठ घाला. पाण्यात कपडा घालून शू बाईटवर लावा. या कपड्याने १५ मिनिटे पाय शेका. सूज आणि वेदन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

अॅपल व्हिनेगर

शू बाईट दूर करण्याचा हा सोपा घरगुती उपाय आहे. अॅपल व्हिनेगर कापसाच्या बोळ्यावर घेऊन शू बाईटवर लावा. त्यामुळे वेदना, सूज कमी होईल. इंफेक्‍शन दूर होण्यास मदत होईल. कांद्याच्या पेस्टमध्ये अॅपल व्हिनेगर घालून शू बाईटवर लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

एरंडेल तेल

कोरडेपणा, खाज, त्वचेचा लालसरपणा दूर करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी शू बाईटवर एरंडेल तेल लावा. 

पेट्रोलिअम जेली

फक्त फाटलेल्या ओठांसाठी नाही तर शूट बाईट दूर करण्यासाठीही पेट्रोलिअम जेली फायदेशीर ठरते. यामुळे वेदना आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. पाय दिवसातून दोनदा १५ मिनिटांसाठी पाण्यात बुडवून ठेवा. नंतर टॉवेलने कोरडे करा आणि त्यावर पेट्रोलिअम जेली लावा. गरम पाण्यामुळे वेदना आणि इंफेक्‍शन दूर होईल. तर पेट्रोलिअम जेली त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यास मदत करेल.