उन्हाळ्यातील घातक आजारांवर करा वेळीच उपाय

जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांवरील घरगुती उपाय

Updated: May 6, 2019, 11:40 AM IST
उन्हाळ्यातील घातक आजारांवर करा वेळीच उपाय title=

मुंबई : हवामानात होणाऱ्या बदलामुळे आजाराही आपलं रुप बदलायला लागतात. असेच काही आजार आहेत, जे उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक तीव्रतेने आपल्यावर हल्ला करतात. हे आजार सामान्य वाटत असले तरी यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. वेळेत यावर उपाय केला नाही तर शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. जाणून घ्या उन्हाळ्यातील आजार आणि त्यावर केले जाणारे घरगुती उपाय...

उष्माघात - 

उन्हाळ्यात उष्माघात (हिटस्ट्रोक) सर्वाधिक होणारी समस्या आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने उष्माघाताचा त्रास होऊ लागतो. ही उन्हाळ्यातील सर्वात सामान्य समस्या वाटत असली तरी लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होत असतात. उष्माघातात अन्न विषबाधा, ताप, पोटदुखी, उलट्या होणे अशा समस्या होऊ लागतात. उष्माघाताचा त्रास न होण्यासाठी खाण्या-पिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवा. अधिक पाणी प्या. हिरव्या पालेभाज्या, सलाड, फळांचं अधिक सेवन करा. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.

अॅसिडिटी -

उन्हाळ्यात अॅसिडिटी ही सर्वात मोठी समस्या असून प्रवासादरम्यान अॅसिडिटीचा अधिक त्रास होत असतो. छातीत जळजळ होणे, दुखणे, उलटी सारखं होणे अशा समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करा. जेवणाची वेळ निश्चित ठेवा. अॅसिडिटीचा त्रास खूप होत असल्यास जेष्ठमधाचं चूर्ण किंवा काढा बनवून घेऊ शकता. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

कावीळ -  

उन्हाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना कावीळचा धोका अधिक असतो. दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. कावीळमध्ये डोळे आणि नखं पिवळी होतात. लघवीलादेखील पिवळं होतं. कावीळवर वेळीच उपचार करणं अतिशय गरजेचं असतं. कावीळ झाल्यास तेलकट, तळलेले पदार्थ, उडीद डाळ खाऊ नये. उकडलेलं किंवा हलकं जेवावं. उकळलेलं पाणीच प्यावे. गुळ आणि सुंठीचं मिश्रण सकाळी थंड पाण्यासोबत खाल्लाने फरक पडतो. भिजवलेल्या चिंचेच्या पाण्यात काळी मिरी पावडर आणि काळं मीठ मिक्स करुन खाल्यानेही फायदा होतो. 

कांजण्या -

कांजण्या झाल्याने शरीरावर लाल डाग पडतात. त्यामुळे डोकेदुखी, ताप, घशात खवखव होते. कांजण्यांमध्ये सर्दी, खोकलाही होतो. त्यामुळे संक्रमणाचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. बाहेरुन घरात आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. कांजण्या आलेल्याला वेगळे बसवावे. कोरफडीचा रस लावल्याने फायदा होतो. कडुलिंबाची पेस्टही संपूर्ण अंगावर लावू शकता. लसणाच्या पाकळ्यांचा रस पाण्यात मिसळून लावा परंतु ५ मिनिटांत लगेच धुवून टाका.

डिहायड्रेशन - 

डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमी होणे. शरीरातील पाणी कमी झाल्याने इतर आजार होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी अधिक पाणी प्या. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या. काकडी, शहाळं, हिरव्या भाज्या, लिंबू पाणी, बेलाचं सरबत, खसचं सरबताचं अधिक सेवन करा.