देशातील या रुग्णालयात केली जाणार मोफत प्रसुती

रुग्णालय प्रसुतीच्या संबंधीत सर्व प्रकरणांचा खर्च स्वत: करणार आहे. 

Updated: May 5, 2019, 03:15 PM IST
देशातील या रुग्णालयात केली जाणार मोफत प्रसुती  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक पीजीआय (PGI) चंदीगढमध्ये सर्व प्रसुती मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर एक वर्षांपर्यंतच्या लहान मुलांवरील इलाजही मोफत करण्यात येणार आहे. या निर्णयाआधी रुग्णालयाकडून प्रसुतीसाठी १००० रुपये घेण्यात येत होते. पीजीआय एक अशी संस्था आहे जिथे प्रसुतीची अनेक गंभीर प्रकरणे हाताळली जातात. 

'झी बिझनेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पीजीआयचे वैद्यकीय अधीक्षक ए. के गुप्ता यांनी सरकारने जिल्हा रुग्णालयात या सुविधा मोफत केल्या आहेत. त्यामुळे आम्हीदेखील आता प्रसुती मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. 'पीजीआय'मध्ये १ महिन्यात जवळपास ४९० गुंतागुंतीची प्रसुतीची प्रकरणे हाताळली जातात. प्रसुतीची गुंतागुंतीची प्रकरणं असल्यामुळे पीजीआयमध्ये होणाऱ्या प्रसुतींची संख्या जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतीच्या तुलनेत कमी असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. 

आता रुग्णालय प्रसुतीच्या संबंधीत सर्व प्रकरणांचा खर्च स्वत: करणार आहे. माता बाल संरक्षण योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालयात प्रसुती मोफत केली जाते. बाल मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. सध्या बाल मृत्यू दर वर्षाला ५६ हजार इतका आहे. या योजनेअंतर्गत केवळ प्रसुतीच नाही तर दरम्यान लागणारा सर्व औषधांचा खर्चदेखील मोफत केला जाणार आहे. प्रसुतीवेळी जेवणही मोफत देण्यात येते. प्रसुतीवेळी रक्ताची गरज लागल्यास त्याचेही पैसे घेण्यात येत नाहीत. उपचारानंतर घरी पाठवण्याची जबाबदारीही रुग्णालयाची असते.