डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात

डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.  

- | Updated: Dec 10, 2024, 04:01 PM IST
डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात title=

Side Effects Of Dieting:आजकाल अनेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त असतात आणि त्यावर उपाय म्हणून ते अन्न कमी खाण्याचा निर्णय घेतात. पण ते योग्य प्रकारे डायटिंग करत आहेत का, हे त्यांना कळत नाही. योग्य मार्गाने न जाता कमी खाऊ लागतात त्यामुळे अनेक त्रास उद्भवू लागतात. 

योग्य आहार न घेतल्याने होणारे त्रास: 
आपण बऱ्याचदा तेलकट, तुपकट, जास्त मसाल्याचे पदार्थ खाण्याची सवय लावून घेतो, ज्यामुळे वजन वाढतं. यावर उपाय म्हणून अनेकजण डायटिंग करायला लागतात, पण योग्य मार्गदर्शनाशिवाय केलेले डायटिंग शरीरासाठी नुकसानकारक ठरते. योग्य आहाराऐवजी कमी खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कमी खाण्याऐवजी संतुलित आणि पोषक आहार घेणे अधिक फायदेशीर ठरते.  

डायटिंगचे दुष्परिणाम 
1. शरीरातील अशक्तपणा: शरीराला आवश्यक तेवढे पोषण आणि ऊर्जा न मिळाल्यास थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यामुळे दैनंदिन जीवनातील साधे कामही कठीण वाटू लागते. अशा स्थितीत शरीर बारीक होण्याऐवजी अधिक कमकुवत होते, ज्यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते.  

2. मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावणे: योग्य आहार न घेतल्यास शरीराची मेटाबॉलिझम प्रक्रिया  मंदावते. मेटाबॉलिझम कमकुवत झाल्यास शरीराने उर्जा निर्माण होणे कमी होते. त्यामुळे शरीरातील चरबी साठून राहते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अशा चुकीच्या सवयीमुळे वजन कमी होण्याऐवजी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.  

3. पचनसंस्थेवर परिणाम: संतुलित आहाराऐवजी कमी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे, फायबर आणि जीवनसत्त्वे मिळत नाहीत, ज्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात. दीर्घकालीन पचन समस्येमुळे शरीर कमजोर होऊ शकते.  

4. पित्ताशयातील खडे तयार होण्याचा धोका: कमी कॅलरीयुक्त आहार घेतल्याने पित्ताशयामध्ये दगड तयार होण्याचा धोका वाढतो.शरीराला पुरेश्या कॅलरीज आणि पोषकतत्वांची गरज असते. परंतु पोषक असे कॅलरिज शरीरास मिळत नसतील तर अशा समस्यांमुळे शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आहार नियोजन करणे महत्त्वाचे आहे.  

5. मानसिक ताण आणि चिडचिड: अन्नातून शरीराला मिळणाऱ्या आवश्यक पोषकतत्त्वांमुळे मेंदू व्यवस्थित कार्य करतो. मात्र, जेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही, तेव्हा मानसिक ताण वाढतो, झोपेचे विकार होतात आणि चिडचिड अधिक होते. अशा स्थितीत वजन कमी होण्याऐवजी मानसिक स्वास्थ्य बिघडते. 

डायटिंग करताना संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे. कमी खाण्याऐवजी शरीराला आवश्यक पोषणमूल्ये मिळतील याची काळजी घ्या. वजन कमी करायचे असल्यास नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या शरीराची गरज ओळखून योग्य निर्णय घ्या.