....म्हणून स्वत:ला चोर म्हणायचे डॉ. लागू

रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत.... 

Updated: Dec 17, 2019, 11:09 PM IST
....म्हणून स्वत:ला चोर म्हणायचे डॉ. लागू title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मराठी कलाविश्वात आपल्या कारकिर्दीच्या बळावर उत्तुंग उंचीवर पोहोचलेल्या आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या डॉ. श्रीराम लागू यांनी कायमची एक्झिट घेतली आहे. वयाच्या ९२व्या वर्षी लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत प्रत्येक भूमिका अगदी ताकदीने निभावणाऱ्या डॉ. लागू यांच्या अभिनयाचं नेमकं गुपित काय, याचा उलगडा त्यांनीच काही वर्षांपूर्वी 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. 

वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कारकिर्दीतून काढता पाय घेत कलाविश्वातील कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यामुळे हे कितपत आव्हानात्मक होतं, असं विचारलं असता ज्या गोष्टीवर तुमचं नितांत प्रेम असतं त्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक परिसीमा ओलांडता या शब्दांत त्यांनी उत्तर दिलं होतं. 

रंगभूमीचा 'नटसम्राट' हरपला, श्रीराम लागू यांच्या निधनानं ट्विटरवर हळहळ

'नटसम्राट'मध्ये साकारलेली भूमिका अभिनेते आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरली. अर्थात ती भूमिका सोपी नव्हती हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं.

'कोणत्याही चांगल्या अभिनेत्यासाठी चांगली भूमिका ही कधीच सोपी नसते. ज्यावेळी प्रेक्षक आजही गणपतराव बेलवलकर यांचा आवाज, त्यांचे संस्कार आणि त्यांच्या भूमिकेतील बारकाव्यांविषयी मला विचारतात तेव्हा मलाही हसूच येतं. फक्त नटसम्राटच नव्हे, तर प्रत्येक भूमिकेसाठी, प्रत्येक पात्रासाठी मी फक्त त्या भूमिकेविषयी वारंवार वाचतो आणि त्यातूनच ते पात्र उभं राहतं. त्याचवेळी तुम्हाला रितेपणाचीही जाणीव होते. किंबहुना माझ्या अभिनयाचं गुपित सांगावं तर, मी एक चोर आहे. जेव्हा केव्हा मी मराठी, हिंदी, कन्नड किंवा ब्रिटीश भाषेतील कोणत्याही चित्रपटातील उत्तम अभिनेता पाहतो तेव्हा मी त्याचं निरिक्षण करतो. त्यांचं चालणं, बोलण, शब्दफेक आणि बरंच काही त्यात येतं. त्यातूनच मी काही गोष्टी टीपतो आणि त्या माझ्या शैलीशी एकरुप करण्याता प्रयत्न करतो', असं नटसम्राट अजरामर करणारे डॉ. श्रीराम लागू म्हणाले होते.