The Kerala Story On OTT : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने चित्रपटगृहात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. वादग्रस्त विषय आणि बेधडक मांडणीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला होता. यामुळे या चित्रपटावर बरीच टीकाही झाली. तसेच काही ठिकाणी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत झळकली होती. तिच्यासोबतच या चित्रपटात योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्रींनीही प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात कोणताही मोठा कलाकार नसतानाही हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट ओटीटीवर कधी पाहायला मिळणार, असा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. अखेर याचे उत्तर समोर आले आहे.
अभिनेत्री अदा शर्माने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अदा शर्माने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात "सरप्राईज.... सर्वाधिक चर्चेत राहिलेला द केरला स्टोरी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीपासून 'द केरला स्टोरी' हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे", असे अदा शर्माने म्हटले आहे.
द केरला स्टोरी हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 8 महिने उलटले असले, तरीही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झालेला नव्हता. यामुळे अनेक प्रेक्षकांकडून हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याबद्दल प्रश्न विचारले जात होते. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, असे बोललं जात होतं. पण नंतर हा चित्रपट अतिशय संवेदनशील विषयावर बेतलेला असल्याने कोणतेही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अखेर झी 5 ने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची होणारी फसवणूक, लाखो हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती, याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आले आहे. केरळमधील दहशतवादी कटांवर हा चित्रपट आधारित आहे.