तनुश्री दत्ताचा कोणत्या राजकारण्यांकडून छळ?

बॉलिवूड माफिया, जुन्या राजकीय सर्किटकडून लक्ष्य - तनुश्री

Updated: Jul 20, 2022, 07:04 PM IST
तनुश्री दत्ताचा कोणत्या राजकारण्यांकडून छळ? title=

Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने आणखी एक सनसनाटी आरोप केला आहे. बॉलिवूड माफिया (Bollywood Mafia) आणि महाराष्ट्रातील एक जुनं राजकीय सर्कीट यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. तिने एका भल्यामोठ्या इन्स्टाग्राम (instagram) पोस्टमध्ये अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. 
2018मध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर आरोप करत तनुश्रीने भारतात #MeToo चळवळ छेडली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला लक्ष्य करण्यात येत असून यामागे बॉलिवूड माफिया, आताही राजकारणात सक्रीय असलेली एक जुनी यंत्रणा आणि देशविरोधी गुन्हेगारी शक्ती असल्याचे तिचे म्हणणे आहे. माजी मिस इंडिया असलेल्या तनुश्रीने या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कुणाचीही नावे दिली नसली तरी तिने प्रथमच राजकारणातील काही शक्ती आपल्याविरोधात असल्याचे म्हटले आहे. 

'आत्महत्या करणार नाही'
#MeTooमधून आपण ज्यांचे बिंग फोडले असे गुन्हेगार आणि सामाजिक संस्था याला जबाबदार असल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. आपल्या चित्रपटांमध्ये अडचणी आणल्या गेल्या, आपल्या जीवाला धोका निर्माण केला गेला, असे अनेक आरोप तनुश्रीने केले आहेत. 'माझा मानसिक, शारीरिक छळ कितीही करा. माझ्यावर कितीही दबाव टाका. पण मी आत्महत्या करणार नाही हे कान उघडे ठेवून ऐका. मी कुठेही जाणार नाही' असेही तनुश्रीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ठणकावले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial)

कोण आहे तनुश्री दत्ता ?
बिहारमधील जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या तनुश्री दत्ताने वयाच्या विसाव्या वर्षी 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धा जिंकली. त्याच वर्षी, म्हणजे 2004मध्ये तिने इक्वोडोरमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत टॉप 10मध्ये येण्याचा मान पटकावला. 2005 ते 2010 या काळात तिने आशिक बनाया आपने, भागमभाग, ढोल, 36 चायना टाऊन, स्पीड, साँस बहू और सेन्सेक्स अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 

#MeTooची सुरूवात
26 सप्टेंबर 2018मध्ये तनुश्रीने एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकरांवर सनसनाटी आरोप केले. 2009 साली हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या शूटिंगवेळी आपला छळ केला गेल्याचे तिचे म्हणणे आहे. तनुश्रीचे हे आरोप भारतातील #MeToo या चळवळीची सुरूवात ठरली होती. त्यावेळीही तिने महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षावर गंभीर आरोप केले होते.