चेन्नई : Loksabha 2019 रविवारी सुपरस्टार अभिनेते आणि अभिनय विश्वातून राजकारणाकडे आपला मोर्चा वळवणारे रजनीकांत बरेच चर्चेत होते. आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. जवळपास वर्षभरापूर्वी राजकारणात प्रवेश करणारे रजनीकांत यंदा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार अशी अनेकांनाच आशा होती. पण, रविवारी त्यांनी जाहीर केलेला निर्णय अनेकांचीच निराशा करुन गेला. रजनी यांच्या या निर्णयानंतर त्याचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या अभिनेता कमल हसन यांनी त्यांना एक टोला लगावला आहे.
निवडणूकांच्या रिंगणात उतरल्यानंतर निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतल्यावर हशा होणारच, असा टोला त्यांनी लगावला. 'मी राजकारणात प्रवेश करत आहे तर निवडणुकांचा सामना करणं अपेक्षितच आहे. मग त्या विधानसभा निवडणुका असो किंवा लोकसभा. आम्ही पुढच्यावेळी निवडणुकांच्या रिंगणात उतरू, असं जर म्हटलं गेलं तर जनता तुमचा आदर करत नाही', असं हसन म्हणाले. पुदुच्चेरी एका कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याविषयीची माहिती देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
काही महिन्यांतच येऊ घातलेल्या निव़डणुकांविषयी विचारताच त्यांनी सूचक विधान केलं. 'शरीराला तेल लावून, मांडी थोपटून झाल्यानंतर आपण दुसऱ्या कोणत्यातरी दिवशी येतो असं म्हणत कुस्तीच्या आखाड्यातून डाव खेळण्यापासून मागे हटता येत नाही', असं म्हणत त्यांनी आपली धोरणं स्पष्ट केली. सुपरस्टार रजनीकांत यांनी तूर्तास आपला पक्ष लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेत सध्यातरी तामिळनाडूतील विधानसभा निवडणूकांवरच आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. सोबतच येत्या काळात आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट करत पक्ष कार्यकर्त्यांमी पक्षाच्या चिन्हाचा, नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करु नये असा सल्लाही त्यांनी दिला होता.
थलैवाच्या या निर्णयानंतर राजकीय आणि कलाविश्वात बऱ्याच चर्चांनी डोकं वर काढलं. त्यातच कमल हसन यांनी लगावलेला टोला पाहता आता मैत्रीच्या नात्यात आलेल्या या राजकारणाच्या स्पर्धेवर खुद्द रजनीकांत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.