पाकिस्तानचा शबाजा आजमी-जावेद अख्तर यांच्यावर जळफळाट

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Updated: Feb 17, 2019, 11:25 PM IST
पाकिस्तानचा शबाजा आजमी-जावेद अख्तर यांच्यावर जळफळाट title=

कराची : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आजमी यांनी त्यांचा पाकिस्तानचा नियोजीत दौरा रद्द केला. पाकिस्तानकडून आलेलं आमंत्रण रद्द केल्यामुळे 'आर्ट्स काऊन्सिल ऑफ पाकिस्तान'चा मात्र चांगलाच जळफळाट झाला आहे. शबाना आजमी यांचे वडिल आणि शायर कैफी आजमी यांच्या शताब्दी समारोहासाठी जावेद अख्तर आणि शबाना आजमी पाकिस्तानला जाणार होत्या.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द डॉननं' दिलेल्या वृत्तानुसार काऊन्सिलचे अध्यक्ष अहमद शाह म्हणाले, जावेद अख्तर यांनी काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारांसाठी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याची हिंमत दाखवावी'.

'शबाना आजमी यांनी पाकिस्तानवर टीका करून सीमा ओलांडली आहे. ही पद्धत एका सभ्य व्यक्तीला शोभा देत नाही. मला शबाना आजमींसाठी दु:ख होत आहे. पुलवामामधल्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं शबाना आजमींनी निराशा जाहीर केली, ते पाहून मला दु:ख झालं,' अशी प्रतिक्रिया अहमद शाह यांनी दिली.

'शबाना आजमी यांच्या इच्छेचा आम्ही सन्मान केला. कैफी आजमी यांच्या काव्याचा अल्बम लॉन्च करण्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली होती. यासाठी संगीतकार अरशद मेहमूद यांनी नऊपैकी सहा गाणी तयार केली होती. हे पाकिस्तान निष्पक्ष आणि कला प्रेमी असल्याचं दाखवतं', असा कांगावा शाह यांनी केला.

२३ आणि २४ फेब्रुवारीला काऊन्सिल कैफी आजमी यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहे. या कार्यक्रमाला पाकिस्तान आणि अन्य देशांमधले प्रसिद्ध कवी आणि साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. पण पुलवामामधल्या हल्ल्यानंतर या दोघांनी पाकिस्तानला जायचा निर्णय रद्द केला.

'कराची आर्ट काऊन्सिलने दिलेल्या आमंत्रणानंतर शबाना आणि मी कैफी आझमी यांच्या काही काव्यरचनांवर आधारित एका कार्यक्रम आणि परिषदेसाठी जाणार होतो. पण, आता मात्र आम्ही हा बेत रद्द केला आहे. १९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी कैफी आझमी यांनी एक कविता लिहिली होती. और फिर कृष्ण ने अर्जुन से कहाँ.... असे त्याचे बोल होते', असं त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहत सीआरपीएफसोबत असणाऱ्या आपल्या खास नात्याची माहिती दिली.