मुंबई : 'बूट पॉलिश', 'जागते रहो' आणि 'नया दौर' या चित्रपटांतून बालकलाकाराच्या रुपात झळकलेल्या अभिनेत्रीनं एकाएका सर्वांच्या नजरा वळवल्या. या अभिनेत्रीचं नाव आहे डेझी इराणी(Daisy Irani).
डेझी इराणी यांचं अभिनेता फरहान अख्तर याच्याशीही खास नातं. फरहानची आई, हनी इराणी यांची बहीण म्हणजे डेझी इराणी. थोडक्यात त्या फरहानची मावशी.
इराणी यांचा चेहरा तसा प्रेक्षकांच्या ओळखीचा. काही वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला होता.
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोठा उलगडा केला. वयाच्या सहाव्या वर्षी आईनं नेमून दिलेल्या 'गार्डियन'नंच डेझी यांच्यावर बलात्कार केला होता.
एका आऊटडोअर शुटिंगदरम्यान हे घडलं होतं. आई, आपल्याला लोकप्रिय करण्यच्या ध्येय्यानं पेटून उठलेली, असंही त्या म्हणाल्या होत्या.
'ज्या व्यक्तीनं असं केलं तो माझा गार्डियन होता. मद्रासमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो माझ्यासोबत आला होता.
एके रात्री हॉटेलच्याच रुममध्ये त्यानं माझ्यावर बलात्कार केला, मला पट्ट्यानं मारलं आणि हे जर मी कोणाला सांगितलं तर मला जीवे मारेन अशी धमकी त्यानं दिली', असं म्हणत त्यांनी धक्कादायक प्रसंग शब्दांत मांडला.
आजही त्या वेदना विसरले नाही...
इतक्या वर्षांनंतरही जेव्हा त्या घटना आठवतात तेव्हा त्या वेदना, ती मारहाण आपण विसरलो नसल्याचं डेझी यांनी सांगितलं.
आपल्यासोबत इतकं सारं होऊनही दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या सेटवर मी अशी गेले जणू काही झालंच नाही, असा खुलासा त्यांनी केला.
मद्रासमध्ये आपल्या मुलीसोबत नेमकं काय घडलं याची माहिती डेझी यांच्या आईला खुप वर्षांनंतर झाली. पण, तेव्हा फारच उशीर झाला होता.
प्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबलेवाली यांचा तो नातेवाईक होता, ज्यानं इराणी यांचा बलात्कार केला होता. आज तो या जगात नसला तरीही त्याच्यामुळं झालेल्या वेदना इराणी यांना तिळतिळ तोडतात.
बऱ्याच बालकलाकारांच्या आई-वडिलांना इराणी यांनी यानिमित्तानं सतर्क केलं.
स्वत:च्या बालपणाचा उल्लेख डेझी 'ब्लॅक कॉमेडी' असा करतात. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना आईनं एका निर्मात्याची भेट घालून दिली. जो त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता.
डेझी यांच्याबरोबर घडलेल्या या सर्व घटना त्यांच्या आयुष्याला बऱ्याच पद्धतीनं बदलून गेल्या. स्वत:साठी लढण्याची ताकद त्यांना देऊन गेल्या. पण, या सर्व वेदना मात्र त्यांच्या मनात आजही कायम आहेत.