'केदारनाथ'च्या वाटेत अडथळे, लव्ह जिहादशी संबंध ?

जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

Updated: Nov 5, 2018, 09:20 AM IST
'केदारनाथ'च्या वाटेत अडथळे, लव्ह जिहादशी संबंध ? title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान हिच्या पहिल्याच चित्रपटाच्या वाटेत अ़डचणी येण्यास सुरुवात झाल्याचं कळत आहे. सुशांत सिंह राजपूत आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'केदारनाथ' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतरच एका नव्या वादाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही भाजप नेत्यांनी हा चित्रपट लव्ह जिहादला दुजोरा देत असल्यामुळे त्याच्यावर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. 

२०१३ मध्ये केदारनाथ मंदिर परिसरात आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानक आधारलेलं आहे. हजारोंनी या नैसर्गित आपत्तीमध्ये आपले प्राण, आप्तजन गमावले होते. 

सुशांत आणि साराची भूमिका असणाऱ्या केदारनाथ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुशांत हा मन्सूर हे पात्र साकारताना दिसतोय, नमाज पठण करताना दिसतो. याशिवाय तो मुक्कू (सारा अली खान) नावाच्या एका मुलीच्या प्रेमातही पडतोय. मुख्य म्हणजे या दोघांमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या दृश्यांसोबतच त्यांच्यातील चुंबनदृश्यामुळे नव्या वादाने डोकं वर काढलं आहे

उत्तराखंड येथील भाजपाचे माध्यम संपर्क प्रमुख अजेंद्र अजय यांनी शुक्रवारी सोशल मीजियाच्या माध्यमातून या ट्रेलरविषयी नाराजी व्यक्त केली. 

'हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचं स्पष्ट होत आहे. दिग्दर्शकाला मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्रासाठी एखादं हिंदू नाव सुचलं नाही का? त्याशिवा करोडोंचं श्रद्धास्थान असणाऱ्या एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रणयदृश्य किंवा एखाद्या चुंबनदृश्याचं चित्रीकरण करणं हे धर्माचा अनादर करणारं आहे', अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

ट्विटरच्या माध्यमातून सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष प्रसून जोशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि इतर संबंधित मंडळींकडे त्यांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. 

'केदारनाथ' या चित्रपटाच्या वाटेत आलेल्या एकंदर अडचणी पाहता आता यावर काही तोडगा निघतो का आणि निघालाच तर चित्रपट प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.