'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला शनायाचा अखेर रामराम!

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. 

Updated: Aug 23, 2018, 06:13 PM IST
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला शनायाचा अखेर रामराम! title=

मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. गुरु-शनायाने मिळून राधिकाला दिलेल्या त्रासाचा बदला राधिका चांगलाच घेत आहे. नवी बॉस बनून राधिका गुरु-शनायाला चांगलीच कामाला लावत आहे. त्यामुळे त्रासलेल्या, पिचलेल्या गुरु-शनायाचे धाबे दणाणले आहेत. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांना भावलं आहे.

शनाया लोकप्रिय

गेली दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. यातील शनायाची व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय झाली. शनायाचे नखरे, नटखट अदा, स्टाईल, तिचा मुर्खपणा, तिची मस्ती लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भावली.

अनेक प्रेक्षक तर फक्त शनायासाठी मालिका बघतात, असे रसिकानेच मुलाखतीत सांगितले होते. शनायाची भूमिका नेगेटीव्ह असली तरी त्यात हलके-फुलकेपणा आणण्याचे काम या टीमला भारीच जमले आहे. 

सहज सुरेख अभिनय 

अभिनेत्री रसिका सुनीलचे हे पहिलेच काम असले तरी तिने ते अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. तिचा अभिनय इतका सहज सुरेख आहे की, तिच्याऐवजी या भूमिकेसाठी दुसरं कोणाचा विचारच आपल्याला करता येत नाही. शनायाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, रसिका सुनीलसाठीच शनाया हे पात्र बनले आहे, असे वाटते.

रसिकाच्या उत्तम अभिनयामुळे अल्पावधीत हे पात्र लोकप्रिय झाले आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण केले. तिच्या वागणूकीचा अनेकांना राग येत असला तरी मिळणारे प्रेमही तितकेच खरे आहे.

शनायाची एक्झिट

पण आता रसिका सुनील म्हणजेच शनाया ही मालिका सोडत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण त्या अफवा असल्याचे समोर आले होते. पण आता पुन्हा एकदा शनाया ही मालिका सोडत असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजतेय. 

शनाया म्हणजे रसिका दिग्दर्शन आणि फिल्ममेकिंगचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचं समजलं आहे. त्यामुळेच ती या मालिकेतून एक्झिट घेत आहे. मालिकेत रंजक ट्विस्ट सुरु असताना मोक्याच्या क्षणी रसिका ही मालिका सोडत असल्याने निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

पण आता शनायाची भूमिका नक्की कोण साकारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर नवी येणारी शनाया प्रेक्षकांना किती भावेल, हा ही एक प्रश्नच आहे.