50 वर्षानंतरही 'पिंजरा'ची जादू कायम

व्ही. शांताराम दिग्दर्शित 'पिंजरा' हा सिनेमा 1972 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

Updated: Mar 31, 2022, 07:06 PM IST
50 वर्षानंतरही 'पिंजरा'ची जादू कायम title=

मुंबई :  व्ही. शांताराम दिग्दर्शित 'पिंजरा' हा सिनेमा 1972 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा आजच्याच दिवशी म्हणजेच 31 मार्च 1972 साली चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. मुख्य म्हणजे या सिनेमाला आज पंन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या सिनेमातील वैशिष्ट म्हणजे या सिनेमातील गाणी तुफान गाजली. 'मला लागली कुणाची उचकी', 'छबीदार छबी' आणि 'कशी नशिबान थट्टा आज मांडली', अशी सदाबहार गाणी या सिनेमाने प्रेक्षकांना दिली.

श्रीराम लागू, निळू फुले, अभिनेत्री संध्या यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 'पिंजरा' सिनेसृष्टीतील पहिला रंगीत तमाशाप्रधान सिनेमा मैलाचा दगड ठरला. पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मागे टाकत या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले होते.

सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या सिनेमाचं हटके प्रमोशन होतं. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शकांकडे खूप कमी वेळ होता. त्यात पैशांची चणचण असल्यामुळे व्ही.शांताराम यांना एक जबरदस्त अशी युक्ती सुचली. ती म्हणजे त्यांनी शहरातल्या काही रिक्षा निवडल्या आणि त्यावर कोणाचेच फोटो किंवा पोस्टर न लावता फक्त पिंजरा असं लिहीलं.

यामुळे अनेकांना हा प्रश्न पडला की नेमकं पिंजरा हे प्रकरण आहे तरी काय? जसा हा सिनेमा प्रदर्शित झाला तशी प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे पुण्यात हा सिनेमा तब्बल १३४ आठवडे चालला. १९७३ साली या सिनेमाला राष्ट्रीय पूरस्काराने गौरविण्यात आलं.