मुंबई : ब्रिटीश-आयरिश बॉय बँड 'द वॉन्टेड' चा मेंबर आणि गायक टॉम पार्कर यांचं निधन झालं आहे. तो 33 वर्षांचा होता. टॉम पार्करच्या मृत्यूचं कारण ब्रेन ट्यूमर असल्याचं सांगितलं जात आहे. टॉमच्या मृत्यूची पुष्टी त्याची पत्नी केल्सी हार्डविक हिने Instagram द्वारे केली आहे. ही दुःखद माहिती ऐकून गायकाच्या चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही शोकसागरात बुडाले आहेत. टॉमच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
टॉम पार्करच्या मृत्यूबद्दल माहिती देताना, त्याची पत्नी केल्सीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर टॉमचा कुटुंबसोबत आणि त्याचा सिंगल फोटो शेअर केला आहे. पोस्टच्या पहिल्या फोटोत ब्लॅक एण्ड व्हाइट फोटोमध्ये टॉम कॅमेऱ्याकडे पाहून पोझ देत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये टॉम त्याच्या कुटुंबासोबत दिसत आहे.
टॉमच्या पत्नीची भावनिक पोस्ट
हे दोन फोटो शेअर करताना केल्सीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''टॉमचं आज सकाळी (३० मार्च) कुटुंबियांच्या उपस्थितीत निधन झाले. आम्ही दु:खी आहोत टॉम आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता आणि आम्ही त्याच्या स्मित आणि उत्साही उपस्थितीशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. तुमच्या सगळ्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू."
केल्सीला टॉमची पत्नी असल्याचा अभिमान आहे
केल्सीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ''आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा प्रकाश त्याच्या मुलांच्या भविष्यावर नेहमीच चमकेल. टॉमची काळजी घेण्यात आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. टॉमने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आणि मला माझ्या पतीचा नेहमीच अभिमान असेल.
टॉम पार्कर दीर्घकाळापासून ब्रेन कँन्सरने ग्रस्त होता
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, टॉम आणि केल्सीचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर, कपलने त्यांच्या पहिल्या मुलाचं एक मुलगी आणि मुलगा म्हणून स्वागत केलं ज्याचा जन्म 2020 मध्ये झाला. ऑक्टोबर 2020 मध्ये टॉमला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती पण अखेर त्याने जगाचा निरोप घेतला.