परेश रावल यांच्या मुलाची बॉलिवूडमध्ये 'बमफाड' एन्ट्री

परेश रावल यांनी दुजोरा दिला आहे. परेश रावल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. परेश रावल यांना त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Updated: Jan 23, 2019, 05:22 PM IST
परेश रावल यांच्या मुलाची बॉलिवूडमध्ये 'बमफाड' एन्ट्री title=

नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षापासून अनेक स्टार किड्स डेब्यू करत आहेत. आता या रांगेत ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलनेही एन्ट्री केली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या चित्रपटातून आदित्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या बातमीला स्वत: परेश रावल यांनी दुजोरा दिला आहे. परेश रावल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. परेश रावल यांना त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी 'बमफाड' चित्रपटातून आदित्य रावल एन्ट्री करणार आहे. चित्रपटात आदित्य रावलसोबत अभिनेत्री शालिनी पांडे स्क्रिन शेअर करणार आहे. रंजन चंदेल हे 'बमफाड' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचे कथानक अलाहबादमध्ये फुलणाऱ्या एका प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटाचे निर्माते अजय राय यांनी 'बमफाड' हा शब्द उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध असून हा शब्द चित्रपटातील पात्रांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटलंय. मात्र, चित्रपट कधी प्रदर्शित होणार ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

आदित्य रावलच्या पदार्पण चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत अतिशय गोपनीयता पाळण्यात आली होती. गेल्या वर्षी २०१८ साली कानपूरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करत प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप पाडली. परेश रावल यांनी केलेल्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र आता चित्रपटसृष्टीत आदित्यची कामगिरी पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.