Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. 1998 साली प्रदर्शित झालेल्या आमिरच्या गुलाम या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. फक्त चित्रपटाची पटकथा नाही तर आमिरच्या अभिनयाची देखील स्तुती करण्यात आली होती. या चित्रपटातील आमिर खान आणि राणी मुखर्जीची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याच चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ हे गाणं चांगलच गाजलं होतं. सगळेच सीन परफेक्ट होईपर्यंत काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमिरनं याच चित्रपटातील एका सीनसाठी त्याचा जीव धोक्यात टाकला होता.
खरंतर, 'गुलाम' चित्रपटात आमिर खानचा ट्रेनसमोर एक स्टंट होता. हा सीन चांगलाच चर्चेचा ठरला होता. आमिर खाननं ट्रॅकवर वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर धावत हा धोकादायक स्टंट केला होता. ट्रेन जवळ येताच तो रुळावरून दूर उडी मारतो. स्टंट शूट झाल्यानंतर आमिरने पडद्यावर हे दृश्य पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. एका सेकंदाचाही उशीर झाला असता तर ट्रेनची धडक बसली असती हे त्याच्या लक्षात आले. याचा खुलासा आमिरनं पूजा बेदीच्या जस्ट पूजा या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्या सीनविषयी बोलताना आमिर म्हणाला, "ट्रेनचा हा सीन तीन अॅंगलनं शूट करण्यात आला होता. स्पेशल इफेक्ट्सच्या माध्यमातून दोन अँगल तयार करून समोरचा अॅंगल होता त्याला ट्रेनसोबत शूट करण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्या लक्षात आले नाही, पण नंतर जेव्हा मी एडिटिंगच्या वेळी तो सीन पाहिला तेव्हा मी स्वतः घाबरलो होतो. ट्रेन आणि मी 1.2 सेकंदाचे अंतर होते. तो सीन करण्यासाठी मी 3 टेक घेतले. मला वाटले की ट्रेन माझ्यापासून दूर आहे, पण ती माझ्या अगदी जवळ आली होती."
हेही वाचा : CID फेम Vivek आता काय काम करतोय? 11 वर्षांनंतर ओळखणं कठीण
मुकेश भट्ट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर चित्रपटाचे दिग्दर्शिन विक्रम भट्ट यांनी केले होते. मुकेश भट्ट यांनी वाइल्ड फिल्म्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आमिरचा ट्रेनसोबत असलेला हा सीन सगळ्यात आधी त्यांनी स्वत: केला होता. याविषयी बोलताना ते म्हणाले, "मी त्यादिवशी खूप टेन्शनमध्ये होतो, कारण जर त्याला एक सेकंदही उशीर झाला असता तर ट्रेननं त्याला धडक दिली असती. गरजेपेक्षा जास्त मेहनत करणारा तो अभिनेता आहे. शूटिंगदरम्यान आमिर त्याच्या भूमिकेत इतका मग्न झालेला की आपल्या जीवाला धोका आहे हे तो विसरला. देवाच्या कृपेनं आमिर वाचला नाही तर तो आज आपल्यासोबत नसता."